मोठी बातमी! झारखंडमध्ये तब्बल २५ रुपयांनी स्वस्त होणार Petrol-Diesel; मुख्यमंत्र्यांची घोषणा, पण अटी लागू!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 03:35 PM2021-12-29T15:35:16+5:302021-12-29T15:36:28+5:30
Petrol Diesel In Jharkhand: झारखंडमधील नागरिकांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी नववर्षाची भेट दिली आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २५ रुपयांनी घट होणार आहेत.
Petrol Diesel In Jharkhand: झारखंडमधील नागरिकांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी नववर्षाची भेट दिली आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २५ रुपयांनी घट होणार आहेत. तशी घोषणात मुख्यमंत्री सोरेन यांनी केली आहे. पण याचा लाभ फक्त बीपीएल कार्ड धारकांना म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना होणार आहे. २६ जानेवारीपासून झारखंडमध्ये बीपीएल कार्ड धारकांना पेट्रोल आणि डिझेल मूळ किमतीपेक्षा २५ रुपयांनी स्वस्त मिळणार आहे, अशी घोषणा हेमंत सोरेन यांनी केली आहे.
झारखंड पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननं देखील वारंवार पेट्रोल आणि डिझेलवरील वॅट कमी करण्याची मागणी केली होती. असोसिएशनकडून सरकारकडे पेट्रोलवरील ५ टक्के वॅट घट करण्याची मागणी केली जात होती. सरकारनं जर पेट्रोलवरील वॅट २२ टक्क्यांवरुन १७ टक्के इतका केला तर जनतेला मोठा दिलासा मिळेल असं असोसिएशनचं म्हणणं होतं. शेजारील उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओदिशामध्ये डिझेलचा दर कमी आहे. त्यामुळे झारखंडहून येणारी वाहनं शेजारील राज्यांमध्ये डिझेल भरुन घेत आहेत. त्यामुळे त्यांना नुकसान सहन करावं लागत असल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे.
पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलियम डिलर्सनं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र देखील लिहिलं होतं. तसंच अर्थमंत्र्यांची भेटही घेतली होती. पण त्यावर अद्याप कोणताच निर्णय घेतला जात नव्हता. झारखंडमध्ये १३५० पेट्रोल पंप आहेत. त्यावर जवळपास २.५० लाखाहून अधिक कुटुंबीयांची उपजीवीका आधारलेली आहे. वॅटच्या जास्तीच्या दरामुळे व्यापारावर परिणाम होत आहे.