"क्रिकेटपटू कधीतरी सेंच्युरी करतात, पण BJP दररोज सेंच्युरी ठोकतंय", काँग्रेसचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 01:08 PM2021-10-17T13:08:03+5:302021-10-17T13:09:23+5:30
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरुन नागरिकांचं बजेट कोलमडलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनं सामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे.
नवी दिल्ली-
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरुन नागरिकांचं बजेट कोलमडलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनं सामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. पेट्रोलनंतर आता डिझेलनंही देशात काही ठिकाणी शंभरी गाठली आहे. याच मुद्द्यावर काँग्रेस नेते जयवीर शेरगिल यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. "क्रिकेटपटू कधीतरी सेंच्युरी ठोकण्यात यशस्वी होतात. पण भाजपा सरकार जनतेविरुद्ध इंधन दरवाढीचा सामना खेळत असून दररोज सेंच्युरी ठोकत आहे", असा टोला जयवीर शेरगिल यांनी लगावला आहे.
Cricketers hit century occasionally but BJP Govt hits century+ on daily basis while playing a match of fuel price rise with people of India; Everyday same story “BJP Ki Loot Zaari Hai” as fuel prices scoreboard keep ticking & rising !!
— Jaiveer Shergill (@JaiveerShergill) October 17, 2021
इंधन दरवाढीचा स्कोअरबोर्ड सर्वसामान्य जनतेला एकाच गोष्टीची दररोज आठवण करुन देत असतो की 'भाजपाची लूटमार सुरू आहे', असंही शेरगिल यांनी म्हटलं आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज ३५ पैशांची वाढ झाली आहे. त्यानुसार आज दिल्लीत पेट्रोलची किंमत १०५.८४ रुपये प्रतिलीटर तर डिझेलची किंमत ९४.५७ रुपये प्रतिलीटर इतकी झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा आजचा दर १११.७७ रुपये प्रतिलीटर तर डिझेलचा दर १०२.५३ रुपयांवर पोहोचला आहे.