Petrol Diesel Price: ...तर पेट्रोलियम पदार्थ GST च्या कक्षेत येणार; निर्मला सीतारमण यांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 05:39 PM2023-02-15T17:39:23+5:302023-02-15T17:39:32+5:30
Petrol Diesel Price: 'पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे राज्य सरकारांच्या हातात.'
Petrol Diesel Price: देशात किरकोळ महागाई सातत्याने वाढत आहे. जानेवारी 2023 मध्ये ही 6.52 टक्के होती, जी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 6 टक्के कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलवरील कर दर कमी करणार असल्याची बातमी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका औद्योगिक संघटनेच्या कार्यक्रमात संकेत दिले की, जर राज्यांनी सहमती दर्शवली तर सरकार पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणेल. शनिवारी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीपूर्वी त्यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (PHDCCI) या उद्योग संघटनेच्या सदस्यांना संबोधित केले. यावेळी त्यांना पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, राज्यांमध्ये करार झाला तर या दिशेने पावले उचलली जाऊ शकतात. यासोबतच केंद्र सरकार राज्यांना विजेसह विविध क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, असेही त्या म्हणाल्या.
कर कमी होणार…पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार
देशातील महागाईचा उच्चांक असताना सरकारने पेट्रोल-डिझेल आणि इतर इंधनावरील कर कमी करणे अपेक्षित आहे. किरकोळ महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार मका आणि इंधनावरील कर दर कमी करू शकते असे रॉयटर्सच्या हवाल्याने ET ने सांगितले आहे. यासंदर्भात माहिती असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे की, सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय मार्चमध्ये घेणार आहे. तोपर्यंत फेब्रुवारीची किरकोळ महागाईची आकडेवारीही येईल.