डोनाल्ड ट्रम्प आल्यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 21:43 IST2025-01-21T21:43:20+5:302025-01-21T21:43:54+5:30
Petrol-Diesel Price : केंद्रीय पेट्रोलिय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प आल्यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती...
Petrol-Diesel Price :डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर भारतासह जगातील 70 टक्क्यांहून अधिक आयात करणाऱ्या देशांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढल्या आहेत. भारतात पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही तसे संकेत दिले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानंतर अमेरिका पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवेल, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा अधिक होऊन भाव नियंत्रणात येतील. त्यामुळे जे देश आपल्या गरजेच्या 70 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतात, त्या देशांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.
अमेरिकन तेलाचा पुरवठा वाढेल
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील नवीन प्रशासनाच्या तेल आणि वायूचे उत्पादन जास्तीत जास्त करण्याच्या योजना लक्षात घेता, जास्त प्रमाणात अमेरिकन तेल भारतात येण्याची शक्यता आहे. भारताला तेल पुरवठादारांची संख्या आधीच 27 वरून 39 पर्यंत वाढली आहे आणि जर आणखी तेल आले, तर भारत त्याचे स्वागत करेल.
तेल आणि वायू उत्पादन वाढवण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासनाच्या पावलांबद्दल विचारले असता पुरी म्हणाले की, जर तुम्ही मला विचाराल की, जास्तीचे अमेरिकन इंधन बाजारात येणार आहे का, तर माझे उत्तर होय आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात इंधनाची अधिक खरेदी होण्याची दाट शक्यता आहे.
तेलाच्या किमती कमी होण्याची चिन्हे
पुरी पुढे म्हणाले की, अमेरिकेच्या नवीन प्रशासनाच्या घोषणांवर भारत सरकार अतिशय काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे. ट्रम्प प्रशासनाने घेतलेले काही निर्णय अपेक्षित होते आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी प्रतीक्षा करण्याची गरज आहे. पेट्रोलियम मंत्र्यांनी अमेरिका, ब्राझील, गयाना, सुरीनाम आणि कॅनडा येथून अधिक तेलाची आवक झाल्याचा उल्लेख केला आणि किंमती कमी होण्याचे संकेतही दिले.