पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त
By admin | Published: August 1, 2016 05:05 AM2016-08-01T05:05:19+5:302016-08-01T05:05:19+5:30
पेट्रोल प्रति लीटर १ रुपया ४२ पैशांनी, तर डिझेल २ रुपये १ पैशाने स्वस्त झाले आहे.
नवी दिल्ली : पेट्रोल प्रति लीटर १ रुपया ४२ पैशांनी, तर डिझेल २ रुपये १ पैशाने स्वस्त झाले आहे. चालू महिन्यात दरकपातीची ही तिसरी वेळ आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच सुधारित दर लागू होतील. आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याचा दर आणि चलन विनिमय दराच्या पार्श्वभूमीवर ही दरकपात करण्यात आली आहे.
आता दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लीटर ६१.०९ रुपये आणि डिझेलचा दर ५२.२७ पैसे असेल, असे इंडियन आॅइल कॉर्पोरेशन या सरकारी तेल विपणन कंपनीने सांगितले. याआधी १६ जुलै रोजी पेट्रोलच्या दरात सव्वादोन रुपयांची, तर डिझेलच्या दरात ४२ पैशांची कपात करण्यात आली होती. १ जुलै रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ८९ पैसे व ४९ पैशांची कपात करण्यात आली होती. या दरकपातीआधी १ मेपासून चार वेळा दर वाढविण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)