Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर तज्ज्ञांची भविष्यवाणी; ऐकून सगळ्यांचीच झोप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:12 PM2022-04-06T19:12:11+5:302022-04-06T19:12:43+5:30
कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे वेगवेगळे तज्ज्ञ भविष्यातील अंदाज वर्तवत आहेत.
नवी दिल्ली – देशात ५ राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत इंधनाचे दर जैसे थे होते. त्यात कुठलाही बदल झाला नाही. मात्र आता हळूहळू पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोलडिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर नियमितपणे वाढत आहेत. बुधवारी ६ मार्चला पुन्हा एकदा प्रति लिटर ८० पैशांनी वाढ झाली. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे.
आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे १०५.४१ रुपये प्रति लीटर आणि ९६.६७ रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत सध्या १२०.५१ रुपये प्रति लीटर पेट्रोल तर डिझेल १०४.७७ रुपये प्रति लीटर विक्री होत आहे. आता यासोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत तज्ज्ञांनी केलेली भविष्यवाणी समोर आली आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या तरी नजीकच्या काळात तेलाच्या किमती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उच्च पातळीवर पाहिले तर डिझेलच्या दरात अजूनही सुमारे २५ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पेट्रोलच्या किमतीत २२ रुपयापर्यंत वाढ होऊ शकते.
काय आहे भविष्यवाणी?
कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे वेगवेगळे तज्ज्ञ भविष्यातील अंदाज वर्तवत आहेत. भारतातील तेलाच्या किमती जवळपास ४ महिन्यांपासून स्थिर होत्या. १३७ दिवस तेलाच्या किमती वाढल्या नाहीत. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती नोव्हेंबरमधील ८० डॉलर प्रति बॅरलच्या दरावरून मार्चमध्ये १३९ प्रति बॅरल या विक्रमी उच्चांकावर गेल्याने तेल कंपन्यांवर २.२५ अब्ज (१९,००० कोटी) बोजा पडला आहे. हे पूर्ण करण्यासाठी अजूनही प्रचंड वाढ होण्यास वाव आहे. कोटक सिक्युरिटीच्या अर्थतज्ञांचे म्हणणे आहे की, डिझेलच्या दरात प्रति लिटर १३.१ ते २४.९ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १०.६ ते २२.३ रुपयांची वाढ निश्चित असल्याचे मानले जात आहे.
महागाईचे चटके बसणार
वर्षभरात सातत्याने डिझेलचे दर वाढत आहेत. त्याचा परिणाम सर्व घटकांवर झाला आहे. त्यामुळे घरगुती किराणा मालाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. बांधकाम साहित्य, स्टील, वीट, वाळू, सिमेंट तसेच घरगुती साहित्य, दैनंदिन किराणा मालाचे दर प्रचंड वाढले आहेत. त्याचबरोबर खाद्यतेलाचे भावदेखील गगनाला भिडले आहेत. मात्र, तरीही महागाई थांबण्याचे नाव घेत नाही.