महागाईचा भडका, सर्वसामान्यांना झटका; पेट्रोल, डिझेल आणखी २० रुपयांनी महागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 08:08 AM2022-03-23T08:08:04+5:302022-03-23T08:08:29+5:30

दरवाढीमुळे महागाई वाढणार असल्याने केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीकेचा भडिमार

Petrol Diesel Prices May Rise Sharply by 20 rupees per liter | महागाईचा भडका, सर्वसामान्यांना झटका; पेट्रोल, डिझेल आणखी २० रुपयांनी महागणार?

महागाईचा भडका, सर्वसामान्यांना झटका; पेट्रोल, डिझेल आणखी २० रुपयांनी महागणार?

Next

नवी दिल्ली : पाच राज्यांतील निवडणुकांमुळे तब्बल १३७ दिवस स्थिर राहिलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत मंगळवारी प्रतिलिटर ८० पैशांनी वाढ झाली. तर स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरातही ५० रुपयांची वाढ करण्यात आली. या दरवाढीमुळे महागाई वाढणार असल्याने केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीकेचा भडिमार होत आहे. दरम्यान, इंधनाच्या दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीत आतापर्यंत ३ लाख कोटींची भर पडली आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर ४ नोव्हेंबरपासून स्थिर होते. तर जुलै ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान एलपीजीच्या किमतीत १०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती उच्चांकी स्तरावर पोहोचल्या असतानाही निवडणुकीमुळे एलपीजी आणि पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या.

३,३१,६२१ कोटी रुपये सरकारी तिजाेरीत झाले जमा 
चालू आर्थिक वर्षाच्या (एप्रिल-डिसेंबर) पहिल्या नऊ महिन्यांत (२०२१-२२) मध्ये पेट्रोलियम उत्पादनांवरील सीमा शुल्क आणि अबकारी कराच्या रूपात केंद्र सरकारचा अप्रत्यक्ष कर महसूल जवळपास २४ टक्क्यांनी वाढून ३,३१,६२१.०७ कोटी रुपये झाला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेल्या माहितीमुळे ही बाब समोर आली आहे.

आणखी २० रुपयांनी महागणार?
युद्धामुळे सध्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ होत असून, ते सध्या ११६ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. 
निवडणुकांमुळे १३७ दिवस दरवाढ न केल्याने तेल कंपन्यांना १५ ते २० रुपयांचा तोटा होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी सरकार पेट्रोल, डिझेल दर २० रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

विरोधकांकडून सरकारचे ‘उपहासात्मक अभिनंदन'
देशात एलपीजी सिलिंडर १ हजार रुपये करण्याचे 'लक्ष्य' साध्य केल्याबद्दल पंतप्रधान मोदीजींचे अभिनंदन. आता पेट्रोल व डिझेलच्या दरातही रोजचा 'विकास' होईल. मोदी सरकारच्या काळात केवळ परवडणाऱ्या गोष्टी म्हणजे जातीयवाद आणि द्वेष. बाकी सर्व महाग आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

दरवाढीचा राक्षस...
देशातील ११ शहरांमध्ये सिलिंडरच्या किमती १ हजारच्या पुढे. बिहारमध्ये सिलिंडर सर्वात महाग. मिळतो १०४८ रुपयांना. १ वर्षात १३०.५० रुपयांनी महाग झाला सिलिंडर

गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन हटविण्यात आला आहे. आता सरकार सतत किमतीचा ‘विकास’ करेल. महागाईच्या महामारीबद्दल पंतप्रधानांना विचारा. ते म्हणतील थाळी वाजवा.    
    - राहुल गांधी, काँग्रेस नेते

Web Title: Petrol Diesel Prices May Rise Sharply by 20 rupees per liter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.