गोव्यात पेट्रोल ४ रुपयांनी महाग
By admin | Published: January 1, 2015 02:17 AM2015-01-01T02:17:21+5:302015-01-01T02:17:21+5:30
गोवा सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) साडेतीन टक्क्यांवरून दहा टक्के केला असून, त्याबाबतची अधिसूचना अर्थ खात्याने बुधवारी जारी केली.
पणजी : गोवा सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) साडेतीन टक्क्यांवरून दहा टक्के केला असून, त्याबाबतची अधिसूचना अर्थ खात्याने बुधवारी जारी केली. त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून गोव्यात पेट्रोलच्या दरात लिटरमागे साडेतीन ते चार रुपयांची वाढ झाली आहे.
गोवा सरकारला त्यामुळे दरमहा सहा कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. राज्यात २०१२ मध्ये नवे सरकार अधिकारावर आल्यानंतर पेट्रोलवरील व्हॅट ०.१ टक्का म्हणजे केवळ नावापुरताच ठेवला होता. त्यामुळे सरकार दरमहा सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या महसुलास मुकत होते. राज्य सरकारची आर्थिक स्थिती खालावल्यानंतर गेल्या आॅगस्टमध्ये मूल्यवर्धित कर साडेतीन टक्क्यांपर्यंत वाढविला गेला. त्यानंतर आता व्हॅटमध्ये आणखी साडेसहा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. अर्थ खात्याचे अतिरिक्त सचिव मायकल डिसोझा यांच्या सहीने अधिसूचना जारी झाली असून, ती राजपत्रातही बुधवारीच प्रसिद्ध करण्यात आली.