Petrol Diesel Hike: मे महिन्यात पेट्रोल ३.८३, तर डिझेल ४.४२ रुपयांनी महागले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 06:02 AM2021-06-01T06:02:17+5:302021-06-01T06:02:40+5:30
पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या काळात सरकारने इंधन दरवाढ रोखून धरली होती. निवडणुका संपताच दरवाढ सुरू करण्यात आली. ४ मे रोजी पहिली दरवाढ करण्यात आली होती.
नवी दिल्ली : सोमवारी पेट्रोलच्या दरात २९ पैशांची, तर डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ करण्यात आली. ही मे महिन्यातील १६ वी दरवाढ ठरली असून, त्यात पेट्रोल ३.८३ रुपयांनी, तर डिझेल ४.४२ रुपयांनी महाग झाले आहे.
पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या काळात सरकारने इंधन दरवाढ रोखून धरली होती. निवडणुका संपताच दरवाढ सुरू करण्यात आली. ४ मे रोजी पहिली दरवाढ करण्यात आली होती. आतापर्यंत करण्यात आलेल्या १६ दरवाढीनंतर महाराष्ट्रासह राजस्थान, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांत अनेक ठिकाणी पेट्रोल शंभर रुपयांच्या वर गेले आहे. मुंबई, रत्नागिरी, परभणी, औरंगाबाद, जैसलमेर, श्रीगंगानगर, बन्सवाडा, इंदौर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटूर आणि काकीनाडा यांचा त्यामध्ये समावेश आहे.
राजधानी दिल्लीत आता पेट्रोल ९४.२३ रुपये लिटर, तर डिझेल ८५.१५ रुपये लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल १००.४७ रुपये लिटर, तर डिझेल ९२.४५ रुपये लिटर झाले आहेे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे देशातील पेट्राेल-डिझेलचे दर वाढत असल्याचे सांगण्यात आले.
देशातील प्रमुख महानगरांतील आजचे इंधन दर
शहर पेट्रोल (रु/प्रतिलिटर) डिझेल (रु/प्रतिलिटर)
नवी दिल्ली ९४.२३ ८५.१५
मुंबई १००.४७ ९२.४५
चेन्नई ९५.७६ ८९.९०
कोलकता ९४.२५ ८८.००
बंगळुरू ९७.३७ ९०.२७