रशिया सवलतीत खजिन तेल देण्यास तयार; पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 09:26 PM2022-03-16T21:26:04+5:302022-03-16T21:26:39+5:30
स्वस्त दरात तेल खरेदीसाठी रशियाची भारताला ऑफर; मोदी सरकारकडून विचार सुरू
नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादले आहेत. युरोपियन देशांनीदेखील रशियावर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे रशियाचं नुकसान होत आहे. रशियाकडून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करण्यास अमेरिकेनं नकार दिला आहे. यानंतर रशियानं भारताला सवलतीच्या दरात तेल देऊ केलं आहे. तसा प्रस्तावच रशियानं भारताला दिला आहे.
भारतानं रशियाविरोधात संयुक्त राष्ट्रात मतदान केलेलं नाही. रशियासोबतचे उत्तम संबंध भारतानं कायम ठेवले आहेत. यानंतर रशियानं भारताला स्वस्तात तेल विकण्याची तयारी दर्शवली आहे. मोदी सरकार यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत सरकारनं आज संसदेत दिले. ग्राहकांच्या हितार्थ आवश्यक पावलं उचलू, अशी माहिती सरकारनं दिली.
रशियाकडून तेल खरेदी करताना डॉलरऐवजी रुपयाचा वापर होऊ शकतो. त्यामुळेही सरकारचा फायदा होईल. जवळपास ३.८ मिलियन बॅरल तेल खरेदी केलं जाण्याची शक्यता आहे. रशियाहून येणाऱ्या तेलाचा विमा हा आव्हानात्मक मुद्दा आहे. सध्याच्या स्थितीत कंपन्या विमा देण्यास नकार देत आहेत. तर दुसरीकडे तेलाची डिलेव्हरी करण्यापर्यंतची जबाबदारी घेण्यास तयार आहे. त्यामुळे दोन देशांमधील बातचीत पुढे सरकण्याची शक्यता आहे.
रशियातून स्वस्त दरात खनिज तेल उपलब्ध झाल्यास त्याचा संपूर्ण फायदा भारतीय ग्राहकांना मिळणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून तेलाचे दर सातत्यानं वाढले. मात्र या कालावधीत तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवले नाहीत. त्यामुळे रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करून कंपन्या आधी गेल्या काही दिवसांत झालेलं नुकसान भरून काढतील.