पेट्रोलचे भाव हळूहळू करत महिन्याभरात 5 रुपयांनी वाढले, जोर का धक्का धीरेसे लगे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 02:42 PM2017-08-22T14:42:21+5:302017-08-22T14:46:15+5:30
गेल्या एका महिन्यात पेट्रोलचे भाव प्रति लिटर पाच रुपयांनी व डिझेलचे भाव 4 रुपयांनी वाढले आहेत, ते ही आपल्या अजिबात लक्षात न येता... महागाईचा धक्का न जाणवता
नवी दिल्ली, दि. 22 - गेल्या एका महिन्यात पेट्रोलचे भाव प्रति लिटर पाच रुपयांनी व डिझेलचे भाव 4 रुपयांनी वाढले आहेत, ते ही आपल्या अजिबात लक्षात न येता... महागाईचा धक्का न जाणवता. कारण, कारण एकच आहे की, आता रोज भाव बदलत असल्याने हळू हळू बसलेला हा मोठा धक्का जाणवलाच नाही. दिल्लीमध्ये एका महिन्यापूर्वी पेट्रोलचा भाव प्रति लिटर 63.75 रुपये होता जो आता पाच रुपयांनी वाढून 68.69 रुपये झाला आहे. याच कालावधीत डिझेलचा भावही पाच रुपयांनी वाढून प्रति लिटर 57.07 रुपये झाला आहे.
याआधी दर पंधरा दिवसांनी खनिज तेलांच्या बाजारभावांचा अंदाज घेऊन पेट्रोल व डिझेलचे भाव कमी जास्त व्हायचे. त्यावेळी एकाच महिन्यांत इतकी भाववाढ सहसा कधी होत नव्हती. परंतु रोज भावांचा अंदाज घ्यायचा आणि बाजाराप्रमाणे भाव कमी जास्त करायचे असं धोरण अवलंबल्यापासून एकाच महिन्यात झालेली वाढ आधीच्या तुलनेत खूपच जास्त आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांना भाववाढीची झळ रोजच्य रोज घेतलेल्या रिव्ह्यूमुळे कमी बसेल असा अंदाज त्यावेळी वर्तवण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात उलटच घडलेले दिसत आहे. खनिज तेलाचे भाव गेल्या काही वर्षांमध्ये उतरलेले आहेत आणि रुपया डॉलरच्या तुलनेत वधारला असूनही प्रत्यक्षात मात्र, पेट्रोल व डिझेलच्या भावांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. जूनमध्ये खनिज तेलाचा भाव प्रति बॅरल 46.56 डॉलर होता, जो जुलैमध्ये किंचित वधारत 47.86 डॉलर झाला. अर्तात, या काळात रुपया चांगलाच वधारला व एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 64 रुपये झाली. काही महिन्यांपूर्वी प्रति डॉलर 69 रुपये इतकी रुपयाची घसरण झाली होती.
रुपया वधारला की खनिज तेलाची आयात स्वस्त होते आणि परिणामी पेट्रोल व डिझेलचे भाव कमी होतील अशी अपेक्षा असते.
मुंबईतही पेट्रोल भाववाढीचे पडसाद उमटलेले आहेत. एका महिन्यापूर्वी मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 73.23 रुपये होता जो आता 77.79 रुपये झाला आहे. ही वाढ पाच रुपयांपेक्षा थोडी कमी आहे. डिझेलचे भावही या काळात प्रति लिटर सुमारे 2.5 रुपयांनी मुंबईत वधारले आहेत. रोजच्या रोज काही पैशांनी पेट्रोलचे भाव वाढत असल्यामुळे एका महिन्यात पेट्रोलचा दर पाच रुपयांनी वधारल्याचे जाणवले नसल्याचे मत ग्राहकांनी व्यक्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेलाच्या भावांत चढउतार असल्याचा परिणाम भारतीय बाजारावर होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अर्थात, केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि एक्साइज ड्युटीमध्ये कपात करून ग्राहकांना थोडा दिलासा द्यावी अशी मागणी काही तज्ज्ञांनी केली आहे.