पेट्रोल पंप पुन्हा जाणार कॅशलेसकडून कॅशकडे..!
By admin | Published: January 11, 2017 02:30 PM2017-01-11T14:30:22+5:302017-01-11T14:46:56+5:30
पेट्रोल पंपचालकांनी सोमवारपासून क्रेडिट आणि डेबिट कार्डांनी पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - पेट्रोल पंपचालकांनी सोमवारपासून क्रेडिट आणि डेबिट कार्डांनी पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कार्डांनी पेमेंट केल्यावर प्रत्येक व्यवहारावर बँकांकडून लावण्यात येणा-या 1 टक्का अधिभाराच्या निषेधासाठी हे पाऊल उचललं आहे, अशी माहिती पेट्रोल आणि डिलर असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी दिली आहे.
बन्सल म्हणाले, केएलद्वारे आमचा नफ्याचा वाटा ठरलेला असतो. मात्र बँक जास्त शुल्क आकारत आहे. मार्जिनचा हिशेब ठेवण्यासाठी आम्ही विशिष्ट तंत्र अवगत केलं आहे. त्यामुळे जास्त शुल्क आकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बँकांच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या डिलर्सना आर्थिक नुकसान होणार आहे. मात्र दुसरीकडे आयसीआयसीआय बँक कार्डांच्या व्यवहारावर कोणतेही अधिकचे शुल्क आकारणार नसल्याची माहिती बँकेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
(पेट्रोल पंपांवर 13 जानेवारीनंतरही कार्डांनी स्वीकारणार पेमेंट)
(पेट्रोल पंपांवर तूर्तास कॅशलेस पेमेंट सुरू राहणार)
तत्पूर्वी देशभरातील पंप चालकांनी सोमवारी ९ जानेवारीपासून क्रेडिट अथवा डेबिट कार्डांवर इंधन न देण्याचा इशारा दिल्यानंतर हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने डिजिटल पद्धतीने पैसे देणाऱ्यांना इंधनाच्या दरात ०.७५ टक्के सूट देण्याची योजना जाहीर केली होती. त्यामुळे कार्डांच्या व्यवहारावर शुल्क आकारले जात नव्हते. मात्र बँकांच्या या निर्णयामुळे मोदींच्या कॅशलेस मोहिमेला एक प्रकार हरताळ फासण्याचा प्रयत्न झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.