पेट्रोल पंपांवर मिळणार औषधे, भाज्या, किराणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:43 AM2017-08-18T00:43:24+5:302017-08-18T00:50:04+5:30
देशातील जवळपास ५५ हजार पेट्रोलपंप लवकरच सुपर मार्केट बनणार आहेत.
नितीन अग्रवाल ।
नवी दिल्ली : देशातील जवळपास ५५ हजार पेट्रोलपंप लवकरच सुपर मार्केट बनणार आहेत. सरकार तेथे पेट्रोलियम उत्पादने आणि आॅटो सर्व्हिसेसशिवाय फळे, भाज्या, औषधे, किराणा सामान व विजेच्या वस्तू विकण्याची तयारी करीत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ५५ हजार पेट्रोलपंप जनसेवा केंद्रांची भूमिका पार पाडतील. तेथे जेनेरिक औषधे व फळे, भाज्या आणि विजेचे साहित्य उपलब्ध असेल. या सुपर मार्केटची सुरुवात विजेची बचत करणारे बल्ब, ट्युबलाइट आणि पंख्यांपासून होईल.
धर्मेंद्र प्रधान आणि ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील तीन पेट्रोलिमय कंपन्या आणि ऊर्जा मंत्रालयाची कंपनी एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) यांच्यात करार झाला आहे. पेट्रोलपंपांवर बल्बसाठी ७० रुपये, ट्युबलाइटसाठी २२० रुपये आणि पंख्यासाठी फक्त १,२०० रुपये द्यावे लागतील.
पीयूष गोयल म्हणाले की, याची सुरुवात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील पेट्रोलपंपांपासून केली जाईल आणि टप्प्याटप्प्याने देशातील सर्व ५४ हजार ५०० पेट्रोल पंपांवर ही सेवा सुरू होईल. ही केंद्रे केवळ इंधनाची गरजच भागवतात, असे नसून शहर, महामार्ग आणि ग्रामीण क्षेत्रांत इतरही सुविधा देत असतात. यामुळे ईईएसएलची वीज बचत करणारी उत्पादने जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतील.
ईईएसएल सरकारच्या दक्षता ऊर्जा कार्यक्रमाला लागू करणारी संस्था आहे. त्या अंतर्गत वीज वितरण कंपन्या आणि इतर रिटेल चेनसारख्या आॅनलाइन मार्केट प्लसच्या माध्यमातून एलईडी बल्ब आणि लाइटचे वितरण करतात.
ईईएसएल ९ वॅटचे एलईडी बल्बला ३८ रुपये प्रति युनिटने विकत घेते. ईईएसएलने नुकतीच लंडनमधील बाजारात १० कोटी पौंडांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
>बाजारभावापेक्षा स्वस्त
आतापर्यंत उज्ज्वला योजनेअंतर्गत २५.५ कोटी एलईडी बल्ब आणि ३०.६ लाखांपेक्षा जास्त ट्यूबलाइट लोकांच्या घरी पोहोचले आहेत, असे गोयल म्हणाले. विशेष म्हणजे बाजारात आधीच उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या तुलनेत या उत्पादनांचे भाव कमी असल्यामुळे उत्पादकांना आपले भाव कमी करावे लागले आहेत. त्याचा थेट लाभ ग्राहकांना झाला आहे.