पेट्रोल प्रतिलिटर 3.38 रुपये, तर डिझेल प्रतिलिटर 2.67 रुपयांनी महागले
By admin | Published: August 31, 2016 08:30 PM2016-08-31T20:30:33+5:302016-08-31T20:49:11+5:30
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. पेट्रोलच्या प्रतिलिटर दरात 3.38 रुपयांची वाढ झाली असून, डिझेलच्या प्रतिलिटर दरात 2.67 रुपयांची वाढ केली आहे. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या लोकांना पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा झटका दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती वाढल्यानं ही भाववाढ केल्याची माहिती यावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिली आहे.
तत्पूर्वी 15 ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी दरात कपात केली होती. त्यावेळी पेट्रोल प्रतिलिटर एका रुपयाने, तर डिझेल प्रतिलिटर दोन रुपयांनी स्वस्त झाले होते. इंधनाचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर सरकारी तेल कंपन्या दर पंधरा दिवसांनी, म्हणजेच दर महिन्याची पहिल्या आणि 16 व्या दिवशी इंधनाचे नवे दर जाहीर करतात. यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील कच्च्या तेलाच्या किमती आणि परकीय चलनाचा विनिमय दर याचा आधार घेतला जातो.
बदललेल्या दरांनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 63.47 रुपयांना मिळेल. मुंबईमध्ये 68.40, कोलकात्यात 66.84, चेन्नईमध्ये 63.02 असा पेट्रोलचा दर असेल. मुंबईमध्ये डिझेलचा आता 58.48 रुपये प्रतिलिटर असा दर असेल.