Petrol : निवडणुका झाल्या आता दरवाढ कधी?, पेट्रोलियममंत्र्यांनी संसदेत दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 04:50 PM2022-03-16T16:50:58+5:302022-03-16T16:52:16+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 नोव्हेंबर 2021 रोजी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले.
मुंबई - पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या 5 पैकी 4 राज्यात भाजपला चांगलं यशही मिळालं. या कालावधीत गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर होते. युक्रेन-रशियामध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढले. मात्र भारतात इंधनाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे, निवडणूक निकालानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, अशी चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, संसदेतही विरोधी पक्षाच्या खासदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यास, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 नोव्हेंबर 2021 रोजी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले. मात्र, 9 राज्यांनी त्यांच्या राज्यात हे दर कमी केले नाहीत. ग्राहकांवर सातत्याने वाढत असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार, तेल कंपन्या सतत रुसी संघ आणि नवीन बाजारात संवाद साधत आहे. त्यातूनच, लवकर नवे बाजार खुले होतील आणि नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं.
काँग्रेस खासदार छाया वर्मा यांनी राज्यसभेत सरकारवर निशाणा साधला होता. सरकारच तेलाचे भाव ठवरत असून निवडणूक आली की भाव कमी होतात आणि निकाल लागल्यानंतर ते वाढतात, आता कधी वाढणार?, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर, तेलाचे भाव सरकार ठरवत नसून आंतरराष्ट्रीय तेलाच्या किंमतींच्या आधारे तेल कंपन्या हे दर ठरवतात, असे पुरी यांनी सांगितले. तसेच, भारत देशात पाचही वर्षे निवडणुकाच असतात. त्यामुळे, निवडणुकांवेळी तेलाचे भाव कमी केले जातात हे म्हणणं चुकीचं आहे. नुकत्याच निवडणुका संपत आल्या आहेत, आता, पुढील वर्षाच्या सुरुवातीलाही निवडणुका आहेत, असे उत्तर पुरी यांनी लोकसभेत बोलताना दिले.
दरम्यान, अमेरिका, कॅनाडा, जर्मनी यांसारख्या देशांत वाढलेल्या तेलाच्या किमतींची भारतासोबत तुलनात्मक आंकडेवारीही त्यांनी शेअर केली.