गॅस एजन्सीच्या चेक, ड्राफ्टमुळे पेट्रोलियम मंत्रालय झाले बेजार; खोट्या आश्वासनांमुळे लोकांचा गैरसमज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:32 PM2017-12-11T23:32:09+5:302017-12-11T23:48:20+5:30
पेट्रोलियम मंत्रालयाकडे सध्या रोजच्या रोज असंख्य चेक आणि ड्राफ्ट येत असून, ते पाठवणा-यांना जवाहर रोजगार योजनेअंतर्गत गॅस एजन्सी हवी आहे. सुरुवातीला ते का येत नाहीत, हेच कळत नव्हते.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : पेट्रोलियम मंत्रालयाकडे सध्या रोजच्या रोज असंख्य चेक आणि ड्राफ्ट येत असून, ते पाठवणा-यांना जवाहर रोजगार योजनेअंतर्गत गॅस एजन्सी हवी आहे. सुरुवातीला ते का येत नाहीत, हेच कळत नव्हते. पण कोणी तरी दिलेल्या खोट्या आश्वासनांमुळे लोकांनी ते पाठवायला सुरुवात केल्याचे तपासात आढळून आले. आता ते चेक व ड्राफ्ट परत करण्याचे काम सुरू झाले आहे.
मंत्रालयातील एका अधिका-याने सांगितले की, रोज २५ ते ३0 चेक, ड्राफ्ट आमच्याकडे येत आहे. ते यायला सुरुवात झाल्यानंतर खात्यात गोंधळ सुरू झाला. एक खाते दुस-याकडे, दुसरे तिस-याकडे हे चेक व ड्राफ्ट पाठवू लागले. अखेर प्रकरण पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापर्यंत पोहोचले. तेव्हा त्यांनी ते संबंधितांना परत करा, असे आदेश दिले. तसेच ही योजना कोणी जाहीर केली वा कोणाला सांगितली, याचा शोध घ्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. चेक, ड्राफ्ट परत पाठवतानाच, ही अफवा कोणी पसरवली, तिच्यामागे एखादी संघटित टोळी तर नाही ना, याआधी या लोकांकडून कोणी पैसे तर वसूल केले नाहीत ना, याचा शोध घेणे सुरू झाले आहे.
लोकांकडे विचारणा
लोकांना खात्री वाटावी, म्हणून सरकारी खात्याच्या नावावर चेक घ्यायचे आणि रोख रक्कम स्वत: घ्यायची, असे कोणी करीत आहे का, हेही तपासले जात आहे. ज्यांचे चेक वा ड्राफ्ट आले आहेत, त्यांच्याकडेही याबाबत विचारणा केली जाणार आहे.