पाळीव कुत्र्यांपायी मोडला संसार
By admin | Published: September 9, 2015 04:15 PM2015-09-09T16:15:10+5:302015-09-09T16:15:10+5:30
पाळीव कुत्र्यांपायी बेंगळुरुत एका नवविवाहीत दाम्पत्याचे लग्न तुटले आहे. कुत्रे किंवा सासर यापैकी एक पर्याय निवड असा पतीने सांगितले असताना त्याची पत्नी दोन्ही कुत्र्यांना घेऊन माहेरी निघून गेली.
ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. ९ - पाळीव कुत्र्यांपायी बेंगळुरुत एका नवविवाहीत दाम्पत्याचा संसार मोडला आहे . कुत्रे किंवा सासर यापैकी एक पर्याय निवड असा पतीने सांगितले असताना त्याची पत्नी दोन्ही कुत्र्यांना घेऊन माहेरी निघून गेली. बेंगळुरुमधील या घटनेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
बेंगळुरुत राहणा-या राजेशचे (नाव बदललेले) २०१४ मध्ये केरळमध्ये राहणा-या चित्रा (नाव बदललेले) या तरुणीशी लग्न झाले होते. हे दोघेही उच्चशिक्षीत असून चांगल्या कंपनीत नोकरीही करतात. लग्नाच्या एक आठवड्यानंतर चित्राने माहेरुन दोन लॅब्रेडोर कुत्रे आणले. हे दोन्ही कुत्रे माझ्यासोबतच राहतील असे तिने सासरच्या मंडळींना सांगितले. सासरच्या मंडळींनी यावर आक्षेपही घेतला मात्र चित्रा तिच्या निर्णयावर ठाम होती. काही दिवसांनी ती पुन्हा कुत्र्यांना माहेरी सोडून येईल अशी आशा त्यांना होती. हे दोन्ही कुत्रे दिवसरात्र चित्रासोबत असायचे. अगदी पार्टीला जातानाही चित्रा कुत्र्यांना सोबत घेऊन जायची असे राजेशच्या कुटुबीयांचे म्हणणे आहे. रात्री झोपतानाही हे कुत्रे चित्रासोबत असायचे, त्यामुळे पत्नीसोबत एकांत मिळायचा नाही असा दावाही राजेशने केला आहे. तर 'हे कुत्रे माझे जीव की प्राण असून मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही' असे चित्राचे म्हणणे होते.
राजेश - चित्रामधील वाद विकोपाला गेल्यावर हे प्रकरण बेंगळुरु पोलिसांकडे गेले. बेंगळुरु पोलिसांंच्या महिला तक्रारण निवारण केंद्राकडे हे प्रकरण सोपवण्यात आले. केंद्रातील काऊन्सिलर्सनी राजेश व चित्राची समजूत काढून वाद संपुष्टात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र चित्रा तिच्या निर्णयावर ठाम असल्याने तोडगा निघाला नाही अशी माहिती केंद्रातील पोलिसांनी दिली. पती -पत्नीमधील संबंध घरातील पाळीव प्राण्यांमुळे तुटण्याचे प्रकार वाढत असून ही बाब चिंताजनक असल्याचे केंद्रातील वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले.