PF Interest Rate: दिवाळीपूर्वीच नोकरदारांना आनंदाची बातमी; पीएफवर मिळणार 8.5% व्याज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 17:13 IST2021-10-29T17:12:35+5:302021-10-29T17:13:31+5:30
Modi Govt on PF Interest Rate: EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने याच वर्षी मार्चमध्ये 2020-21 च्या पीएफवर 8.5 टक्के व्याज देण्यास परवानगी दिली होती. 2019-20 मध्येही एवढेच व्याज देण्यात आले होते.

PF Interest Rate: दिवाळीपूर्वीच नोकरदारांना आनंदाची बातमी; पीएफवर मिळणार 8.5% व्याज
दिवाळीपूर्वीच देशातील 6 कोटी पीएफ खातेधारकांना मोदी सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. अर्थमंत्रालयाने आर्थिक वर्ष 2020-21 च्या भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफवर 8.5 टक्के व्याज देण्यास परवानगी दिली आहे. (Modi Govt on PF Interest Rate)
कामगार मंत्रालयाचे सचिव सुनील वर्थवाल यांच्या हवाल्याने ईटीने बातमी दिली आहे. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी पीएफवर 8.5 टक्के व्याज देण्यास मंजुरी दिली आहे. आता मंत्रालय लवकरच याची अधिसूचना जारी करणार आहे. EPFO व्याज खातेधारकांच्या खात्यांमध्ये वळते करण्यास सुरुवात करेल त्या आधीच ही अधिसूचना काढण्यात येणार आहे.
सरकारच्या या पावलांमुळे EPFO कडे 300 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक राहणार आहे. गेल्या वर्षी 2019-20 मध्ये 1000 कोटी रपये सरप्लस होते. EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने याच वर्षी मार्चमध्ये 2020-21 च्या पीएफवर 8.5 टक्के व्याज देण्यास परवानगी दिली होती. 2019-20 मध्येही एवढेच व्याज देण्यात आले होते. मार्चमध्ये जरी निर्णय झालेला असला तरी त्याला अर्थमंत्रालय परवानगी देते आणि त्यानंतर अंमलबजावणी केली जाते.
पीएफ बॅलन्स कसा जाणून घ्याल... (how to check pf balance)
जर तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरवरून 011-22901406 या नंबर फोन करावा लागेल. मिस कॉल दिल्यावर तुम्हाला बॅलन्स समजणार आहे. यासाठी तुमचे युएएन, पॅन आणि आधार नंबर लिंक असायला हवेत.
तसेच एसएमएसद्वारे देखील तुम्ही पीएफ बॅलन्स चेक करू शकता. 7738299899 यानंबरवर तुम्हाला एसएमएस करावा लागेल. ‘EPFOHO UAN ENG’ असे लिहून हा एसएमएस पाठविला की काही सेकंदांत तुम्हाला बॅलन्सचा मेसेज येईल.