पीएफ हिंसाचार; बंगळुरूत केंद्रीय दल तैनात
By admin | Published: April 21, 2016 03:35 AM2016-04-21T03:35:43+5:302016-04-21T03:35:43+5:30
पीएफ काढण्यासंबंधीच्या नव्या नियमाविरुद्ध होजियरी उद्योगातील कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनास हिंसक वळण लागल्यानंतर अधिकाऱ्यांनी शहरात केंद्रीय दल तैनात केले असून निर्बंध लागू केले आहेत.
बंगळुरू: पीएफ काढण्यासंबंधीच्या नव्या नियमाविरुद्ध होजियरी उद्योगातील कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनास हिंसक वळण लागल्यानंतर अधिकाऱ्यांनी शहरात केंद्रीय दल तैनात केले असून निर्बंध लागू केले आहेत.
रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी बुधवारी जलाहल्ली क्रॉस परिसरात संचलन केले. याच भागात मंगळवारी सर्वाधिक हिंसाचार भडकला होता. या दरम्यान पोलिसांनी ५० लोकांना अटक केली होती.
मादीवाला ते इलेक्ट्रॉनिक्स सिटीपर्यंत कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या १५ तुकड्या, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि आरएएफच्या तीन तुकड्या तसेच सिटी आर्म्ड रिझर्व्हच्या सहा ते सात तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
आंदोलनातील हिंसाचारप्रकरणी सुमारे १८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दगडफेक, पोलिसांवर हल्ला आणि वाहनांच्या जाळपोळीत सामील होते त्यांची छायाचित्रे आणि फुटेज पोलिसांना प्राप्त झाली असून या सर्वांना अटक करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी २२ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यत बंगळुरू शहराच्या सीमेत कलम १४४ अंतर्गत निर्बंध लावले आहेत. (वृत्तसंस्था)
आंदोलनकर्त्या कामगारांनी काल अनेक वाहने जाळण्यासोबतच पोलीस ठाण्यालाही आग लावली होती. (वृत्तसंस्था)