‘पीएफ’चे पैसे काढणे झाले सोपे!
By admin | Published: February 23, 2017 04:00 AM2017-02-23T04:00:47+5:302017-02-23T04:00:47+5:30
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सदस्यांनी त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडातून
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सदस्यांनी त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडातून पैसे काढण्याची प्रक्रिया आणखी सुलभ केली असून विविध कारणांसाठी पैसे काढताना निरनिराळे फॉर्म न भरता केवळ एका पानाचा सरळ, सोपा असा एकच सामायिक फॉर्म भरून हे काम करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
या सोईचा ‘ईपीएफओ’चे सदस्य असलेल्या पाच कोटींहून अधिक नोकरदारांना लाभ होईल व त्यांचे ‘पीएफ’ कार्यालयात घालावे लागणारे खेटेही वाचतील. सर्व कामाचे संगणकीकरण करून आणि सर्व प्रादेशिक कार्यालये परस्परांशी संगणकीय पद्धतीने जोडल्याने हे शक्य झाले आहे. ‘ईपीएफओ’ने बहुतांश सदस्यांना त्यांच्या खाते क्रमांकाखेरीज व्यक्तिनिहाय खास असा ‘युनिव्हर्सल अकाऊंट नंबर’ही (यूएएन) दिला आहे. सदस्याने आपला हा ‘यूएएन’ नंबर आधार क्रमांकाशी संलग्न करून घेतला असेल तर हा नवा साधा, सोपा एकात्मिक फॉर्म जेथे नोकरी करतो त्या मालकाकडून ‘अॅटेस्ट’ करून न घेताही सदस्य हा फॉर्म स्वत: थेट ‘पीएफ’ कार्यालयात आणून देऊ शकेल, असे ‘ईपीएफओ’ने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
ज्यांनी त्यांचा ‘यूएएन’ नंबर आधार क्रमांकाशी संलग्न केलेला नाही अशा सदस्यांनाही विविध कारणासाठी पैसे काढण्यासाठी निरनिराळे फॉर्म भरावे लागणार नाही. त्यांच्यासाठीही एक पानी सरळ, सोपा एकच फॉर्म तयार करण्यात आला आहे. मात्र अशा सदस्यांना त्यांचा फॉर्म मालकाकडून ‘अॅटेस्ट’ करून घ्यावा लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले. शिवाय ‘पीएफ’मधून ज्या कारणासाठी पैसे काढले त्याचसाठी ते वापरले गेले याचे एक स्वतंत्र प्रमाणपत्र खातेदारास पूर्वी द्यावे लागेल. आता असे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. खातेदाराने तशा आशयाचे स्वत:चे सत्यप्रतिज्ञापत्र देणेही पुरेसे होईल. खातेदारास असे सत्यप्रतिज्ञापत्र पैसे काढण्याच्या फॉर्मसोबत द्यावे लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अर्जासोबत आता पुराव्यांची आवश्यकता नसणार
घर किंवा घरासाठी भूखंड खरेदी, घरबांधणी, घरदुरुस्ती, स्वत:चे वा मुलांचे लग्न, मुलांचे पदव्युत्तर शिक्षण अशा कारणांसाठी सदस्यांना ‘पीएफ’मधून पैसे काढता येतात. याशिवाय कामाच्या ठिकाणची संप/ टाळेबंदी, नैसर्गिक आपत्तीत घराचे नुकसान होणे अशा परिस्थितीतही पैसे काढता येतात.
आतापर्यंत अशा प्रत्येक कारणासाठी स्वतंत्र, किचकट फॉर्म होते व ते मालकांकडून ‘अॅटेस्टेशन’ घेऊन त्यांच्यामार्फतच सादर करावे लागत. शिवाय अर्जासोबत लन्नपत्रिका, घरखरेदीचा करार, शैक्षणिक प्रवेशाच्या फीची पावती अशी कागदपत्रे पुरावे म्हणून द्यावी लागत. आता असे पुरावेही अर्जासोबत द्यायची गरज नाही.