पंजाबनंतर दिल्लीलाही Moderna नं लस पुरवण्यास दिला नकार; विदेशातून लस खरेदी न करण्याचे बिहारचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 01:45 PM2021-05-24T13:45:50+5:302021-05-24T13:49:03+5:30
Coronavirus Vaccine : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली यासंदर्भातील माहिती. थेट लस विकण्यास कंपनीनं नकार दिल्याचं केलं वक्तव्य.
विदेशी फार्मा कंपन्या फायझर आणि मॉडर्नानं दिल्ली सरकारला लस पुरवण्यास नकार दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भातील माहिती दिली. "दोन्ही कंपन्यांनी आम्हाला थेट लसींचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे," असं अरविंद केजरीवाल म्हणाले. यापूर्वी मॉडर्नानं पंजाब सरकारलादेखील लसीचा थेट पुरवठा करणार नसल्याचं म्हटलं होतं. थेट केवळ केंद्र सरकारला लसी पुरवल्या जातील असं त्यांनी म्हटलं होतं.
"आम्ही फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांशी लसींच्या पुरवठ्याबाबत चर्चा केली. दोन्ही कंपन्यांनी आम्हाला थेट लसींचा पुरवठा करण्यास नकार दिला. केवळ भारत सरकारशी व्यवहार करणार असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. केंद्र सरकारनं लसींची आयात करावी आणि राज्यांना ती वाटावी अशी विनंती मी करत आहे," असं केजरीवाल म्हणाले. यापूर्वी पंजाबलादेखील लसींचा थेट पुरवठा करण्यास नकार दिल्याची माहिती पंजाबच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली होती. मॉडर्नानं पंजाबला थेट लसींचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. तसंच त्यांचा केवळ केंद्र सरकारशी व्यवहार आहे असं त्यांनी सांगितलं असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
We've spoken to Pfizer, Moderna for vaccines, and both the companies have refused to sell vaccines directly to us. They have said that they will deal with the Government of India alone. Appeal to the Centre to import vaccines and distribute to the States: Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/aTKc67447w
— ANI (@ANI) May 24, 2021
अनेकांशी संपर्क
"मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सर्व लस उत्पादक कंपन्यांशी थेट लस खरेदी करण्यासंदर्भात संपर्क करण्यात आला होता. यामध्ये Sputnik V, फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांचा समावेश होता. मॉडर्नानं राज्य सरकारसोबत करार करण्यासाठी नकार दिला आहे," असं पंजाबचे नोडल अधिकारी विकास गर्ग यांनी सांगितलं होतं.
विदेशातून लस खरेदी न करण्याचे बिहारचे संकेत
लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी अनेक राज्यांनी जागतिक निविदा मागवल्या आहेत. परंतु बिहार सरकारनं याच्या उलट निर्णय घेतला आहे. जागतिक स्तरावर लस खरेदी करण्यासाठी जाण्याची शक्यता फार कमी असल्याचे संकेत बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी दिले आहेत. त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना यावर भाष्य केलं. "अन्य राज्यांनी जागतिक निविदा मागवल्या आणि त्याचे परिणाण काय आले ते पाहण्याची गरज आहे. आम्हाला १ कोटी १ लाख डोसेस मिळाले आहेत. रविवारपर्यंत ९८ लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे," असं ते म्हणाले होते.