Corona Vaccine: भारताला ‘ना नफा’ तत्त्वावर लस पुरवण्यास तयार; Pfizer ची सरकारला ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 03:57 PM2021-04-22T15:57:19+5:302021-04-22T15:58:40+5:30
Corona Vaccine: भारतातील कोरोना लसीकरण्याच्या व्यापक मोहिमेसाठी कोणताही आर्थिक नफा न कमावता लसींचा पुरवठा करण्याची तयारी फायझरने दर्शवली आहे.
नवी दिल्ली: संपूर्ण देशभरात कोरोनाचा हाहाःकार उडालेला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जागतिक स्तरावर एकाच दिवसात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येचा उच्चांक भारताने गाठला आहे. बुधवारी दिवसभरात ३ लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणावर भर दिला जात असून, परदेशातील लसींच्या वापरालाही मंजुरी देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या व्यापक लसीकरणासाठी Pfizer कंपनी हातभार लावण्यास इच्छुक असून, भारताला ‘ना नफा’ तत्त्वावर लस पुरवण्यास तयारी दर्शवली आहे. (pfizer says it has offered india a not for profit price for government vaccination program)
रॉयटर्सने यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली आहे. अमेरिकन लस उत्पादन करणारी कंपनी फायझरने भारत सरकारला ऑफर देऊ केली आहे. भारतातील कोरोना लसीकरण्याच्या व्यापक मोहिमेसाठी कोणताही आर्थिक नफा न कमावता लसींचा पुरवठा करण्याची तयारी फायझरने दर्शवली आहे. तसेच यासंबंधी भारत सरकारशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
Pfizer says it has offered India a not-for-profit price for its vaccine for government immunization program pic.twitter.com/aTh1quOFYg
— Reuters India (@ReutersIndia) April 22, 2021
ना नफा किमतीत लस देण्याची तयारी
फायझर कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या लसीकरण कार्यक्रमासंबंधी कंपनीची काही वेगळी धोरणे असून, त्याच्या आधारे ना नफा किमतीमध्ये काही देशांना कोरोनाच्या लसी पुरवण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून भारत सरकारने सुरू केलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेसाठी फायझर कंपनी ‘ना नफा’ किमतीमध्ये लस देण्यास तयार आहे. त्यासंबंधी आम्ही भारत सरकारच्या सातत्याने संपर्कात असून, आमची चर्चा सुरू आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
दिलासा! ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टनमला पोहोचली; लवकरच महाराष्ट्रात परतणार
कोरोना लसींच्या किंमती वेगवेगळ्या
विकसित, विकसनशील आणि मागासलेल्या देशांसाठी फायझरच्या कोरोना लसींच्या किमती वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. जगभरातील कोरोना लसीकरणामध्ये कंपनीचा हातभार लागेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. अमेरिकेत फायझरच्या लसीच्या एका डोसची किंमत ही १९.५ डॉलर इतकी आहे. तर युरोपमध्ये कंपनीने आपल्या लसीच्या किंमतीत वाढ केली आहे. सुरुवातीला १२ युरोमध्ये उपलब्ध होणाऱ्या लसीची किंमत १५.५ इतकी करण्यात आली आहे.
एसटी बस आता केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच; अनिल परब यांनी केले स्पष्ट
दरम्यान, आता १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या फार्मा कंपन्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता.