CoronaVirus : फायझर या वर्षी भारताला 5 कोटी डोस देण्यास तयार; पुढील वर्षी येऊ शकते सिंगल डोस व्हॅक्सीन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 08:41 AM2021-05-26T08:41:56+5:302021-05-26T08:43:41+5:30
अमेरिकन फार्मा कंपनी फायझर यावर्षी, म्हणजेच 2021 मध्ये भारताला लशीचे पाच कोटी डोस देण्यास तयार आहे. मात्र, या बदल्यात फायझरला काही सवलती हव्या आहेत. (pfizer vaccine)
नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढवीण्याची मागणी जोर धरत आहे. यातच लस निर्माता कंपन्यांकडून एक दिलासा दायक वृत्त आले आहे. अमेरिकन फार्मा कंपनी फायझर (pfizer) यावर्षी, म्हणजेच 2021 मध्ये भारताला लशीचे पाच कोटी डोस देण्यास तयार आहे. मात्र, या बदल्यात फायझरला काही सवलती हव्या आहेत. (pfizer vaccine 5 crore dose ready to supply us based pharma company)
पीटीआय या वृत्त संस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे, की फायझर वर्ष 2021 मध्येच लशींचे पाच कोटी डोस देण्यास तयार आहे. मात्र, यासाठी कंपनीला नुकसान भरपाईसोबतच महत्वपूर्ण नियामक सूट हवी आहे. याशिवाय, अमेरिकन फार्मा कंपनी मॉडर्ना आपली सिंगल डोस लस पुढील वर्षापर्यंत भारतात लॉन्च करू शकते, असेही पीटीआयने म्हटले आहे. यासाठी मॉडर्ना सिप्ला आणि इतर फार्मा कंपन्यांच्या संपर्कात आहे.
Corona Vaccine: बाजारात लस असेल, तर विकत मिळेल ना?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडर्नाने भारतीय अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे, की त्यांच्याकडे यावर्षी सरप्लससाठी लशी नाहीत. त्यामुळे त्यांना यावर्षी भारताला लशी देता येणार नाही. सिप्ला पुढील वर्षासाठी मॉडर्नाच्या लशीचे पाच कोटी डोसचे उत्पादन करण्यास तयार आहे. यासाठी कंपनीने सरकारची परवानगी मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फायझर जुलैपासूनच लस देण्यास तयार आहे. फायझर लशीचे एक कोटी डोस जुलै, एक कोटी डोस ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात दोन कोटी डोस तर ऑक्टोबरमध्ये एक कोटी डोस द्यायला तयार आहे. यासाठी आपण भारत सरकारसोबतच व्यवहार करू, असेही फायझरने म्हटले आहे. यासाठीचे पेमेंट देखील कंपनी भारत सरकारकडूनच घेईल. सध्या देशात कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनने लसीकरण सुरू आहे.
CoronaVirus: मॉडर्नाची लस 12 वर्षांवरील मुलांवरही परिणामकारक; तिसऱ्या लाटेच्या तोंडावर मोठा दिलासा