Pharma Company License: केंद्र सरकारची 18 फार्मा कंपन्यांवर कारवाई; थेट कंपनीचे परवाने रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 07:47 PM2023-03-28T19:47:23+5:302023-03-28T19:55:55+5:30
Pharma Company License Cancel: बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे बनवणाऱ्या फार्मा कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
Pharma Company License Cancel: बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे बनवणाऱ्या फार्मा कंपन्यांना मोठा दणका बसला आहे. भारत सरकारने मंगळवारी (28 मार्च) बनावट आणि निकृष्ट औषधांच्या निर्मितीसाठी 18 फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द केले. तसेच, या कंपन्यांना उत्पादन थांबवण्यास सांगण्यात आले आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने अनेक औषध कंपन्यांची तपासणी केली होती.
केंद्र आणि राज्याच्या पथकांनी 20 राज्यांमध्ये अचानक तपासणी केली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अधिकृत सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. बनावट औषधांच्या निर्मितीशी संबंधित देशभरातील फार्मा कंपन्यांवर कठोर कारवाई सुरू आहे. सुमारे पंधरा दिवसांपासून ही मोहीम सुरू आहे.
या राज्यांमध्ये कारवाई केली
यादरम्यान हिमाचल प्रदेशातील 70, उत्तराखंडमधील 45 आणि मध्य प्रदेशातील 23 कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अनेक देशांतून भारतीय औषधांमुळे होणारे मृत्यू आणि आजारांच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले. गेल्या महिन्यात गुजरातस्थित फार्मा कंपनी Zydus Lifesciences ने अमेरिकन बाजारातून गाउटवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या जेनेरिक औषधाच्या 55,000 हून अधिक बाटल्या परत मागवल्या होत्या. औषध तपासणीत फेल ठरले.
भारतीय कंपन्यांविरोधात तक्रारी
गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपमुळे कथित 18 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर नोएडा येथील एका फार्मास्युटिकल फर्मच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर भेसळयुक्त औषधे बनवून विकल्याचा आरोप होता. फेब्रुवारी महिन्यात चेन्नईतील एका औषध कंपनीने डोळ्याच्या ट्रॉपची खेप परत मागवली होती. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने संभाव्य संसर्गामुळे अझ्रिकेअर आय ड्रॉप्स खरेदी किंवा वापरू नका असा इशारा दिला होता.