महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस, दबाव टाकून घेतली पदवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 01:21 AM2018-03-03T01:21:28+5:302018-03-03T01:21:28+5:30
पीएचडीची पदवी घेणा-या व्यक्तीकडे त्या संपूर्ण विषयाची माहिती आणि ज्ञान असेलच असे नाही. बोगस पदव्यांचा सुळसुळाट झाला आहे.
- दीपक जाधव
रेनिगुंठा, (आंध्र प्रदेश) : पीएचडीची पदवी घेणा-या व्यक्तीकडे त्या संपूर्ण विषयाची माहिती आणि ज्ञान असेलच असे नाही. बोगस पदव्यांचा सुळसुळाट झाला आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी अशीच बोगस आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्य विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी गुरुवारी जाहीर भाषणात केला. त्यामुळे ते मंत्री नेमके कोण, याच्या चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आंध्र प्रदेशातील तिरुपती आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारण्यात आलेल्या ‘फर्ग्युसन सेंटर फॉर हायर लर्निंग’चे उद्घाटन डॉ. सिंह यांच्या हस्ते केले. सोसायटीचे अध्यक्ष शाहू छत्रपती महाराज, नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, माजी कार्यवाह प्रा. आनंद भिडे, एमसीएचएलचे संचालक डॉ. सचिन खेडकर, डॉ. मोहन स्वामी, वेंकटेश्वरा विद्यापीठाचे कुलगुरू ए. दामोधरम, पद्मावती महिला विद्यापीठाच्या प्रा. दुर्गा भवानी उपस्थित होते.
डॉ. सिंह म्हणाले, ‘पीएचडीची पदवी घेतलेल्या अनेकांना पीएचडी शब्दाचा लॉँगफॉर्मही सांगता येत नाही. त्या त्या विषयाचे व्यवस्थित आणि सविस्तर ज्ञान नसताना देखील पदवी घेऊन बसले आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्याने अशाच प्रकारे बोगस पीएचडी पदवी मिळवली आहे. त्या मंत्र्यानी मला त्यांनी पीएचडी केलेल्या विषयाची माहिती दिली होती, मात्र तो विषय इथे सांगण्या लायकदेखील नाही.’ त्या मंत्र्यानी ज्या विद्यापीठातून ही पदवी मिळवली होती, तिथल्या संबंधित विभागाच्या प्रमुखांना मी फोन केला. या विषयात पीएचडी करण्यास तुम्ही मान्यताच कशी दिली, अशी विचारणा मी त्यांना केली होती. तेव्हा वरिष्ठ पातळीवरून त्या विषयाला मान्यता आणि त्याचबरोबर पदवी देण्यास माझ्यावर दबाव आल्याचे त्यांनी सांगितले, अशी धक्कादायक माहिती सत्यपाल सिंह यांनी दिली. केवळ महाराष्ट्र नाही तर उत्तर प्रदेशातदेखील असे प्रकार होत आहेत. त्याचबरोबर नुकतेच दिल्लीमध्ये बोगस पदवी विकणाºया रॅकेटचा पर्दाफाश झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान तो मंत्री कोण, याबाबत डॉ. सत्यपाल सिंह यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. मात्र माझे नाव ‘सत्य’पाल आहे, असे म्हणून मी जे बोलतो ते खरंच बोलतो, असा निर्वाळा त्यांनी दिला.
>डार्विनबाबच्या विधानामुळे चर्चेला सुरुवात
डार्विन यांच्या सिद्धान्ताबाबत सत्यपाल सिंह यांनी केलेल्या विधानामुळे देशभर प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी माझे वैयक्तिक मत मांडले होते. मी देखील विज्ञानाचा विद्यार्थी होतो आणि आहे. विज्ञान हे विविध प्रकारच्या चर्चा आणि विरोधातून वाढते. माझ्या विधानामुळे या विषयावरील चर्चेला तोंड फुटले, असे मत मांडणारा मी पहिला नाही, यापूर्वीही अनेकांनी असे मत व्यक्त केले आहे. मी केलेल्या विधानानंतर मात्र त्यावर प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली. काही ठिकाणी परिसंवादांचेही आयोजन केले. या निमित्ताने चर्चेला सुरुवात झाली ही चांगली गोष्ट आहे.’’