कॉन्स्टेबलसाठी पीएच.डी.धारक, इंजिनीअर्सचे अर्ज
By admin | Published: June 27, 2016 05:15 AM2016-06-27T05:15:50+5:302016-06-27T05:15:50+5:30
पोलीस कॉन्स्टेबलच्या पदांसाठी नऊ लाखांवर उमेदवारांचे अर्ज आले असून त्यात पीएच.डी., अभियांत्रिकी (इंजिनीअरिंग) तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांनीही अर्ज केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली
भोपाळ : मध्य प्रदेशात १४ हजार पोलीस कॉन्स्टेबलच्या पदांसाठी नऊ लाखांवर उमेदवारांचे अर्ज आले असून त्यात पीएच.डी., अभियांत्रिकी (इंजिनीअरिंग) तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांनीही अर्ज केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एकूण ९.२४ लाख इच्छुकांनी अर्ज केले असून, केवळ बारावी उत्तीर्ण एवढी पात्रता आवश्यक असताना १.१९ लाख उमेदवार पदवी शिक्षण पूर्ण केलेले आहेत. १४,५६२ जण पदव्युत्तर तसेच ९,६२९ इंजिनीअर्स आणि १२ जण पीएच.डी. घेतलेले आहेत. मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाकडून (व्यापमं) ही परीक्षा १७ जुलै रोजी घेतली जाणार आहे.
पीएच.डी. आणि अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या उमेदवारांनीही पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज केले असल्याचे या मंडळाचे संचालक भास्कर लक्षकार यांनी सांगितले. पदवीधारकांविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न झाला असता, लक्षकार यांनी आमचे काम उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण करणे नव्हे, तर केवळ परीक्षा घेणे एवढेच आहे. (वृत्तसंस्था)
>बारावी उत्तीर्ण पाच लाख
बारावी उत्तीर्ण पाच लाखांवर युवकांनी या पदांसाठी अर्ज केले. ३,४३८ युवक पदविकाधारक (डिप्लोमा) आहेत. अनुसूचित जाती-जमातींच्या २.५८ लाख उमेदवारांनी अर्ज केले असून, त्यांच्यासाठी
केवळ आठवी उत्तीर्ण हाच निकष होता. या पदासाठी ५,२०० ते २०,२०० ही वेतनश्रेणी असून, याशिवाय दरमहा १९०० रुपये अतिरिक्त श्रेणी वेतन दिले जाते.