Phethai Cyclone : आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई' चक्रीवादळाने हाहाकार, 11,000 जणांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 11:18 AM2018-12-18T11:18:37+5:302018-12-18T13:07:48+5:30
'तितली' आणि 'गज' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये 'फेथाई' हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे.
भुवनेश्वर - 'तितली' आणि 'गज' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये 'फेथाई चक्रीवादळ' निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाचा फटका आंध्र प्रदेशमधील अनेक भागांना बसला आहे. विशाखपट्टणममध्ये चक्रीवादळाने अनेक झाडे जमीनदोस्त झाली आहेत. तर विजयवाडा शहरात भूस्खलन झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 11,000 लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगडमध्ये या चक्रीवादळामुळे 16 ते 19 डिसेंबरदरम्यान मुसळधार तर विदर्भात हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या भागात ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. तसेच ओडिशाच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
'फेथाई' चक्रीवादळामुळे संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने 22 रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त काही ट्रेनच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 'फेथाई' चक्रीवादळाआधी तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळ तर ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर तितली चक्रीवादळ येऊन धडकले होते. या चक्रीवादळांदरम्यान प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला होता.