हातात मोबाइल आणि कानाला रिसीव्हर, संसदेबाहेर प्रकाश जावडेकरांचा निराळा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 07:16 PM2017-12-22T19:16:10+5:302017-12-22T20:08:44+5:30
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा निराळा अंदाज गुरुवारी संसदेबाहेर पहायला मिळाला. प्रकाश जावडेकर यांनी एका हातात मोबाईल आणि दुस-या हातात रिसीव्हर पकडला होता.
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा निराळा अंदाज गुरुवारी संसदेबाहेर पहायला मिळाला. प्रकाश जावडेकर यांनी एका हातात मोबाइल आणि दुस-या हातात रिसीव्हर पकडला होता. मोबाइलमधून येणा-या किरणोत्सर्गांपासून वाचण्यासाठी कदाचित ते असं करत असावेत, पण त्यांनी असा कोणताही खुलासा यावेळी केला नाही. प्रकाश जावडेकरांच्या हातात लँडलाइनचा रिसीव्हर दिसत होता. लँडलाइनवर बोलल्याप्रमाणे ते बोलताना दिसत होते. पण आपण नेमकं असं का करत आहोत याबद्दल मात्र ते काहीच बोलले नाहीत.
अनेकजण मोबाइल फोन पकडून बोलताना हात दुखत असल्याने हा रिसीव्हर वापरतात. ज्याप्रमाणे इअरफोन मोबाइलला कनेक्ट केला जातो, त्याचप्रमाणे हा रिसीव्हर कनेक्ट केला जातो.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) 2011 मधील आपल्या एका अहवालात सांगितलं होतं की, मोबाइल फोनचा वापर केल्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते. मोबाइलमधून येणा-या किरणोत्सर्गामुळे शरिराला नुकसान पोहोचत असल्याचं संशोधनातून समोर आलं होतं. किरणोत्सर्गांचा डीएनएवर थेट परिणाम होतो. खासकरुन नवजात बाळाला कॅन्सर होण्याचा जास्त धोका असतो.
मोबाइलचा वापर करणाऱ्या व्यक्तींना ब्रेन कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. त्यामुळे फोनवर बोलण्याऐवजी टेक्स्ट मेसेज वा हँड्स-फ्री उपकरणांचा वापर करावा, असेही संघटनेने सुचवले होते. मोबाइलमधून निर्माण होणारे रेडिओ- फ्रीक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्लॅटिक क्षेत्र मानवासाठी कर्करोगकारक असू शकते. त्यामुळे ग्लायोमा या ब्रेन कॅन्सरची शक्यता वाढते, असे मोठ्या प्रमाणावर झालेल्या अभ्यासातून समोर आल्याची माहिती इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरचे (आयएआरसी) जोनॅथन सॅमेट यांनी दिली होती.