एनएसजी प्रवेशासाठी मोदींचा पुतीन यांना फोन
By Admin | Published: June 14, 2016 04:29 AM2016-06-14T04:29:13+5:302016-06-14T04:29:13+5:30
भारताला अणु पुरवठादार समूहाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले असून, या मार्गात आडवा आलेला चीनचा अडथळा दूर करण्यासाठी
नवी दिल्ली : भारताला अणु पुरवठादार समूहाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले असून, या मार्गात आडवा आलेला चीनचा अडथळा दूर करण्यासाठी मोदींनी आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना फोन करून सहकार्य मागितले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेपासून तर अणु करारापर्यंतच्या भारताच्या जागतिक महत्त्वाकांक्षांना रशियाने नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. मोदींनी शनिवारी पुतीन यांना फोन करून त्यांच्याशी एनएसजीच्या सदस्यत्वाबाबत चर्चा केली, अशी माहिती क्रेमलिनने एका निवेदनात दिली आहे. ४८ देशांचा समूह असलेल्या एनएसजीमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी भारत गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. भारताला एनएसजीचे सदस्यत्व मिळावे, यासाठी अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दिला आहे, परंतु चीन मात्र, या मार्गातील मोठा अडथळा ठरत आहे.
‘मोदी व पुतीन यांच्यादरम्यान द्विपक्षीय सहकार्यासह इतर व्यावहारिक मुद्द्यांवर चर्चा झाली,’ असे या निवेदनात म्हटले आहे. भारताला एक वर्ष तरी एनएसजीचे सदस्यत्व मिळू नये, असा चीनचा प्रयत्न आहे. चीनचा प्रयत्न उधळण्यासाठीच मोदींनी पुतीन यांना फोन करून सहकार्य मागितल्याचे समजते. मोदी आणि पुतीन हे लवकरच भेटणार आहेत. (वृत्तसंस्था)