सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांना दूरध्वनीवरून धमक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 01:25 AM2021-05-02T01:25:19+5:302021-05-02T01:25:52+5:30
कोविशिल्डचा जलद पुरवठा करा; सर्वांकडून सातत्याने आग्रह
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांना जलदगतीने लस पुरविण्याची मागणी करणारे अनेक दूरध्वनी सध्या येत आहेत. त्यामध्ये सामर्थ्यशाली नेते, व्यक्ती अशांचा समावेश आहे. त्यातील काही जणांनी पूनावाला यांना धमक्याही दिल्या आहेत. ही माहिती अदर पूनावाला यांनीच एका वृत्तपत्राला मुलाखतीदरम्यान सांगितली.
ते म्हणाले की, मला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे, बड्या उद्योगपतींचे व अन्य लोकांचे दूरध्वनी येत आहेत. सर्वांनाच कोविशिल्ड लस त्वरित हवी आहे. प्रत्येकाच्या या लसीबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. तिचा पुरवठा लवकर व्हावा या आग्रहापायी दूरध्वनी करणारे माझ्याशी आक्रमक सुरात बोलत असतात. मात्र या सर्वांनी दिलेला प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे.
अदर पूनावाला यांना केंद्र सरकारने नुकतीच वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देऊ केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एक अधिकारी प्रकाशकुमार सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहून तशी विनंती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कोरोना साथीविरोधात सुरू केलेल्या लढ्यात सीरम इन्स्टिट्यूट जय्यत तयारीनिशी सहभागी झाली आहे. अशा वेळी अदर पूनावाला यांना मिळणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन त्यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरविणे आवश्यक आहे. पूनावाला यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफवर सोपविण्यात आली आहे.