आसामचा पूर आणि अहवालात फोटो बांगलादेशचा
By Admin | Published: August 1, 2016 05:47 AM2016-08-01T05:47:37+5:302016-08-01T06:34:41+5:30
आसाममधील भयंकर पुरानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे आसामच्या दौऱ्यावर गेले होते.
गुवाहाटी : सरकारी यंत्रणा कधी काय करील याचा नेम नाही. आता हेच पाहा ना, आसाममधील भयंकर पुरानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे आसामच्या दौऱ्यावर गेले होते.
मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या पुराचा अहवाल दिला आणि पुराची भीषणता दर्शविणारी काही छायाचित्रेही सोबत जोडली. त्यातीलच हे एक छायाचित्र. या तरुणाच्या डोळ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे; पण हरिणाचा जीव वाचविण्यास हा आटापिटा
चालला आहे. पण खरी गोम तर इथेच आहे. कारण, हे छायाचित्र
आसामचे नसून बांगलादेशातील २०१४ च्या नोखालीतील पुराचे
आहे. (वृत्तसंस्था)
बांगलादेशातील पुराचे हे चित्र वन्यजीव छायाचित्रकार हसीबूल वहाब यांनी टिपलेले आहे. अगदी जगभरातून या छायाचित्राला खूप प्रतिक्रिया मिळाल्या. अर्थात, ही मोठी चूक असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे; पण काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातही अशीच परिस्थिती होती. त्यामुळे ही गडबड झाली, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
>पुराचा २७.५० लाख लोकांना फटका
बिहारमधील पुराचा फटका २७.५० लाख लोकांना बसला असून, राज्याच्या १२ जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती गंभीरच आहे. उत्तर प्रदेशात अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. बिहारमध्ये पुराने २६ जणांचा बळी घेतला.
१२ जिल्ह्यांत नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. २०० लाख हेक्टरवर २७.५० लाख लोकांना या पुराचा फटका बसला, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने निवेदनात सांगितले.
वैद्यकीय मदतीची शिबिरे
आसाम, बिहारसह देशाच्या पूरग्रस्त भागांतून दहा हजारांपेक्षा जास्त लोकांना वाचविण्यात आले, असे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) रविवारी सांगितले. आसाम आणि बिहारमध्ये एनडीआरएफने वैद्यकीय शिबिरेही सुरू केली आहेत.
>लखनौमध्ये पूरस्थिती
उत्तर प्रदेशात सततधार पावसामुळे गंगेसह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे अनेक खेड्यांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
केंद्रीय जल आयोगाने शारदा नदीचे पाणी सतत वाढत असून पालिया येथे ती धोक्याच्या पातळीवरून वाहात आहे, असे सांगितले.
अयोध्येतील तुरतीपर आणि एल्जिन ब्रिज येथे घागरा नदी सतत धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.
रापती नदी बलरामपूर, बन्सी, रिगाऊली, बिर्द घाट (गोरखपूर) येथे धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. गंगा नदीचे पाणी फतेहगढ, कनौज आणि कानपूर धोक्याच्या पातळीजवळ आले आहे.