चोरी केलेल्या बाइकचा फोटो OLX वर टाकून फसला, पोलिसांची शोधाशोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 07:39 PM2017-09-23T19:39:46+5:302017-09-23T19:41:18+5:30
चोरी केलेली बाइक विकण्यासाठी ओएलएक्सवर फोटो टाकणं एका चोराला चांगलंच महागात पडलं. चोरी केलेल्या बाइकचा फोटो पाहून मालकाने ही आपली बाइक असल्याचं ओळखलं आणि तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
ग्रेटर नोएडा - चोरी केलेली बाइक विकण्यासाठी ओएलएक्सवर फोटो टाकणं एका चोराला चांगलंच महागात पडलं. चोरी केलेल्या बाइकचा फोटो पाहून मालकाने ही आपली बाइक असल्याचं ओळखलं आणि तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. ग्रेटर नोएडामधील सेक्टर गामा -1 मधील ही घटना आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहे.
काही दिवसांपुर्वी सेक्टर गामा -1 येथून एक बाईक चोरीला गेली होती. यानंतर चोराने ही बाइक विकण्याच्या उद्देशाने बाइकचा फोटो काढून ओएलएक्स या ऑनलाइन वेबसाईटवर अपलोड केला. ज्या व्यक्तीची बाइक चोरी झाली होती, त्याला फोटो पाहून ही आपलीच बाइक असल्याची खात्री पटली. यानंतर त्याने अजिबात वेळ न दवडता पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
बाइकचे मालक निरज कुमार ग्रेटर नोएडामधील सेक्टर गामा - 1 येथे आपल्या कुटुंबासोबत राहतात. एका आठवड्याभरापुर्वी निरज कुमार यांची बाइक घराबाहेरुन चोरी झाली होती. जेव्हा ओएलएक्सवर त्यांनी फोटो पाहिला तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवलं. कोणीतरी आपल्या बाइकचा फोटो काढून किंमत आणि पूर्ण डिटेल्ससहित ओएलएक्सवर पोस्ट केल्याचं त्यांना पोलिसांना सांगितलं. कासना कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
ओएलएक्सच्या मदतीने आम्ही चोराची संपुर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत असं पोलीस अधिकारी जितेंद्र कुमार यांनी सांगितलं आहे. यासोबत लवकरच आम्ही चोराला अटक करु असं आश्वासन दिलं आहे.
दुचाकी चोरून ओएलएक्सवर विकणारे चोर अटकेत
याआधीही अशा घटना घडल्या आहेत. वाराणसीत दुचाकी चोरून ओएलएक्सवर विकणाऱ्या चोरांच्या टोळीच्या बनारस पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या टोळीतील अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकजण इंजिनियरिंगचा अभ्यास करत होता.
याबाबत पोलिस अधिकारी अखिलेश सिंग यांनी सांगितले होते की, दुचाकी चोरांना अटक करण्यासाठी ओएलएक्सवर गिऱ्हाइक बनून माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर सामने घाट परिसरातून नीरज सिंह आणि नितेश पांडे यांना एका चोरीच्या दुचाकीसह अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर चौकशीमध्ये दोघांनीही शहरातील वेगवेगळ्या विभागातून आणि व्यावसायिक आस्थापनांमधून दुचाकी चोरल्याचे त्यांनी मान्य केले. या चोरांनी दाखवलेल्या जागेवरून लपवून ठेवलेल्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या.