मंगळयानाने पाठविली लाल ग्रहाची छायाचित्रे
By admin | Published: September 26, 2014 05:00 AM2014-09-26T05:00:51+5:302014-09-26T05:00:51+5:30
पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत अचूकपणे स्थिरस्थावर होऊन भारताच्या वैज्ञानिक क्षमतेची द्वाही दिगंतात मिरविणारे मंगळयान लगेच कामाला लागले
नवी दिल्ली : पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत अचूकपणे स्थिरस्थावर होऊन भारताच्या वैज्ञानिक क्षमतेची द्वाही दिगंतात मिरविणारे मंगळयान लगेच कामाला लागले असून त्याने टिपलेली या लाल ग्रहाची पहिली रंगीत छायाचित्रे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेला (इस्रो) मिळू लागली आहेत.
बुधवारी सकाळी मंगळयान मंगळाच्या कक्षेत शिरल्यानंतर लगेच त्याचा कॅमेरा कार्यान्वित करण्यात आला होता व अल्पावधीच भारतीय यानाने टिपलेले मंगळाचे पहिले रुपडे पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु संध्याकाळपर्यंत उत्कंठावर्धक प्रतीक्षा केल्यानंतर पहिले छायाचित्र २२ कोटी किमीवरून आले आणि वैज्ञानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मंगळ मिशनचे अशक्यप्राय यश अनुभवायला व वैज्ञिनाकांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला पंतप्रधान मोदी स्वत: ‘इस्रो’च्या बंगळूर येथील मुख्य नियंत्रण केंद्रात हजर होते. मंगळयानाने टिपलेल्या मंगळाच्या पहिल्या छायाचित्राची प्रत ‘इस्रो’चे अध्यक्ष के. राधाकृष्णन व वैज्ञानिक सचिव के.कोटेश्वर राव यांनी गुरुवारी सकाळी मुद्दाम दिल्लीला येऊन पंतप्रधान मोदी यांना सुपूर्द केली.
छयाचित्रे मिळत आहेत. अपेक्षेप्रमाणे डेटाही मिळत आहे. हे मंगळयानातील सर्व यंत्रणा सुरळीतपणे सुरु असल्याचे शुभसंकेत आहेत, असे ‘इस्रो’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)