डेटिंग अॅपवरील फोटो, व्हिडिओ, चॅट आणि खासगी माहिती असुरक्षित, समोर आली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 11:48 AM2020-11-06T11:48:10+5:302020-11-06T11:48:32+5:30
Dating App News : डेटिंग अॅपवर ठेवण्यात आलेली माहिती सुरक्षित नसल्याची, तसेच अशा अॅपवरून ही माहिती लीक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही काळात ऑनलाइन डेटिंग अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक जणांकडून या डेटिंग अॅपचा वापर केला जातो. तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात खासगी फोटो, व्हिडिओ आणि अन्य माहितीही शेअर केली जाते. मात्र अशा प्रकारे डेटिंग अॅपवर ठेवण्यात आलेली माहिती सुरक्षित नसल्याची, तसेच अशा अॅपवरून ही माहिती लीक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
ऑनलाइन व्यवहार वाढत असतानाच ऑनलाइन डेटा लीक होण्याचा धोकाही निर्माण झालेला आहे. त्यात कुठलेही डेटिंग अॅप किंवा खास ग्रुप असलेले अॅप लीक झाल्यास ते अधिकच त्रासदायक ठरू शकते. याबाबत वायर्ड या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक दृष्ट्या सुलभ असलेल्या अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या बकेटमध्ये अनेक अॅपमधून घेण्यात आलेले फोटो आणि अन्य खासगी माहिती मिळाल्यानंतर सिक्योरिटी रिसर्चर नोआम रोटेम आणि रेन लोकार यांना धक्का बसला.
यामध्ये 3somes, Cougary, Gay Daddy Bear, BBW Dating, Casualx, SugarD, Herpes Dating आणि GHunt सह अनेक डेटिंग अॅपमधून घेण्यात आलेला डेटा सार्वजनिकपणे उपलब्ध आहे. तज्ज्ञांना अशा प्रकारचा ८४५ गीगाबाईट आणि २.५ मिलियन रेकॉर्ड दिसून आले. त्यामुळे यामध्ये शेकडो वापरकर्त्यांचा डेटा दिसून आला.
या डेटामध्ये संवेदनशील माहिती होती. तसेच यौनसंबंधीची स्पष्ट छायाचित्रे आणि ऑडिओ रेकॉर्डिंग आदींचा समावेश होता. तज्ज्ञांना इतर प्लॅटफॉर्मवरून खासगी चॅटचे स्क्रीनशॉटसुद्धा मिळाले.