भाजपमधून झामुमोत गेलेले फूलचंद मंडलना उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 02:00 AM2019-11-21T02:00:21+5:302019-11-21T02:00:35+5:30
सिंदरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी
रांची (झारखंड) : भाजपचे विद्यमान आमदार फूलचंद मंडल यांनी झारखंड मुक्ती मोर्चामध्ये (झामुमो) प्रवेश केल्यानंतर काहीच दिवसांत त्यांना सिंदरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली.
झामुमोने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी जाहीर केलेल्या सहा उमेदवारांच्या यादीत मंडल यांचे नाव आहे. झामुमोने २८ उमेदवारांची नावे जाहीर केली असून सिंदरी मतदारसंघात भाजपने फूलचंद मंडल यांचे नाव वगळून त्यांच्या जागी इंद्रजीत महातो यांना संधी दिली आहे. झामुमोचे अध्यक्ष शिबू सोरेन यांच्या उपस्थितीत मंडल यांनी १६ नोव्हेंबर रोजी पक्षात प्रवेश केला.
झारखंड विकास मोर्चाने (प्रजातांत्रिक) मंगळवारी नऊ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्याचे आता ६० उमेदवार जाहीर झालेले आहेत. या नऊ जणांत प्रमुख आहेत ते पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बाबूलाल मारांडी. ते धानवर मतदारसंघातून लढतील. मारांडी यांचा पक्ष मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या आघाडीत होता. आता तो स्वतंत्रपणे लढत
आहे. (वृत्तसंस्था)
झारखंडमध्ये नितीश कुमार प्रचारात नाहीत
पाटणा : झारखंड विधानसभा निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे प्रचार करणार नसल्याचे संकेत बुधवारी मिळाले. ही निवडणूक त्यांचा जनता दल (संयुक्त) स्वतंत्रपणे लढत आहे. ‘तुम्ही झारखंडमध्ये प्रचाराला जाणार का’, असे विचारले असता नितीश कुमार म्हणाले, ‘माझी तेथे गरज नाही.’ ते येथे एका कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलत होते.
झारखंडच्या निवडणुकीसाठी जेडीयुने २५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या जेडीयूची भाजपसोबत युती असून त्याने झारखंडचे माजी मंत्री सरयू रॉय यांना मंगळवारी पाठिंबा जाहीर केला. रॉय हे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरोधात जमशेदपूर (पूर्व) मतदारसंघात अपक्ष लढत आहेत.