पत्नीवरील शारीरिक जबरदस्ती हा गुन्हा ठरवू नये, केंद्र सरकारची हायकोर्टात भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 02:43 AM2017-08-31T02:43:57+5:302017-08-31T02:44:18+5:30

पत्नीवरील शारीरिक जबरदस्ती (मॅरिटल रेप) गुन्हा ठरविल्यास विवाहसंस्थेला तडा जाईल, अशी भूमिका केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात घेतली आहे.

Physical coercion of wife should not be a crime; the central government's role in the High Court | पत्नीवरील शारीरिक जबरदस्ती हा गुन्हा ठरवू नये, केंद्र सरकारची हायकोर्टात भूमिका

पत्नीवरील शारीरिक जबरदस्ती हा गुन्हा ठरवू नये, केंद्र सरकारची हायकोर्टात भूमिका

Next

नवी दिल्ली : पत्नीवरील शारीरिक जबरदस्ती (मॅरिटल रेप) गुन्हा ठरविल्यास विवाहसंस्थेला तडा जाईल, अशी भूमिका केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात घेतली आहे. अशी कृती गुन्हा ठरविल्यास महिलांना पुरुषांना अडचणीत आणण्यासाठी हे एक हत्यार मिळेल, असेही सरकारने न्यायालयात म्हटले आहे.
सरकारच्या वतीने अ‍ॅड. मोनिका अरोरा यांनी खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात म्हटले आहे की, जर पत्नीवरील शारीरिक जबरदस्ती कायदेशीर गुन्हा ठरविली, तर ते महिलांसाठी हत्यार बनेल. त्यातून अनेक पुरुषांवर हकनाक आरोप लावले जातील. एखादी व्यक्ती आणि त्याची पत्नी यांच्यातील लैंगिक संबंधांचा कोणताही पुरावा उपलब्ध नसतो. त्यामुळे तो गुन्हा सिद्ध करणेही अवघड आहे. असे झालेच तर विवाहसंस्थाच खिळखिळी होईल.

- पत्नीवरील शारीरिक जबरदस्ती हा कायदेशीर गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्याची मागणी करणारी याचिका रिट फाऊंडेशन या संस्थेने केली आहे. त्यावर मुख्य न्यायाधीश गीता मित्तल आणि न्या. सी. हरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे.

पाश्चिमात्य कायद्याचे अंधानुकरण करणे गरजेचे नाही
केंद्र सरकारने म्हटले की, कोणत्याही कायद्यात लग्नानंतरच्या पत्नीसोबत केलेल्या शारीरिक जबरदस्तीची व्याख्या करण्यात आलेली नाही. काही पाश्चिमात्य देशांमध्ये असलेल्या अशा कायद्याचे अंधानुकरण आपण करावे, हे गरजेचे आहे, असे नाही.
पत्नीसोबतची शारीरिक जबरदस्ती हा गुन्हा ठरवला जाऊ नये, अशा आपल्या म्हणण्याला सरकारने काही कारणेही दिली आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार भारतात महिलांचा शैक्षणिक स्तर कमी आहे.
भारतात बहुतेक महिला आर्थिकरीत्या आत्मनिर्भर नाहीत. समाजाची तशी मानसिकताही नाही. तसेच प्रत्येक समाजाची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे अशा कृतीला कायद्याच्या चौकटीत आणले जाऊ शकत नाही, अशी आमची भूमिका असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Web Title: Physical coercion of wife should not be a crime; the central government's role in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.