जीव मुठीत घेऊन झाडावर ८ तास बसून राहिला, खाली फिरत होते दोन वाघ; वाचा थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 04:47 PM2021-07-13T16:47:25+5:302021-07-13T16:48:48+5:30
विकासने सांगितलं की, जंगलात शिरण्याआधी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला इशारा दिला होता की, आजूबाजूला वाघ आहे. पण त्याने त्यांचं ऐकलं नाही आणि गाडी पुढे नेली.
उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधील पूरनपूर भागात खरनौत नदीच्या पुलाजवळ वाघ आणि वाघिणीच्या हल्ल्यात दोन लोकांचा जीव गेला. हा सगळा थरारक प्रकार त्या व्यक्तीने सांगितला ज्याने पूर्ण रात्रभर झाडावर बसून आपला जीव वाचवला. वाघ आणि वाघिणीच्या या हल्ल्यात वाचलेल्या विकासने आपल्या मित्रांना त्यांची शिकार होताना आपल्या डोळ्यांनी पाहिलं. इतकंच नाही तर जेव्हा तो झाडावर चढला तेव्हा रात्रभर वाघ आणि वाघीण झाडाखाली फेऱ्या मारत होते आणि साडे तीन वाजताच्या सुमारास ते जंगलात परतले. विकासने सांगितलं की, रात्रभर तो झोपू शकला नाही आणि त्याला वाघांचे स्वप्न येत होते.
विकासने सांगितलं की, जंगलात शिरण्याआधी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला इशारा दिला होता की, आजूबाजूला वाघ आहे. पण त्याने त्यांचं ऐकलं नाही आणि गाडी पुढे नेली. विकास म्हणाला की, जेव्हा तो जंगलात पोहोचला तेव्हा दोन वाघ शिकारीची वाट बघत रस्त्याच्या किनारी बसले होते.
तो म्हणाला की, बाइक सोनू चालवत होता. मधे कंधईलाल आणि सर्वात मागे तो बसला होता. तेव्हाच वाघाने मागून हल्ला केला. विकासने हेल्मेट घातलेला होता म्हणून वाघाचा पंजा हेल्मेटवर लागला आणि बाइकचा कंट्रोल गेला. अशात एका वाघाने सोनूवर हल्ला केला आणि त्याचा जीव घेतला. तर कंधई झाडावर चढत होता. तो साधारण ६ फूट वर चढला असेल, पण वाघाने उडी घेत त्याला धरलं आणि त्यालाही मारलं.
विकासनुसार, दोघांचाही जीव गेल्यानंतर दुसऱ्या वाघाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण वाघ हल्ला करेपर्यंत तो झाडावर चढला होता. विकास म्हणाला की, वाघ कंधईचा मृतदेह जंगलात खेचत घेऊन गेला. तर सोनूचा मृतदेह ज्या झाडावर तो बसला होता त्या झाडाखाली पडला होता. कंधईचा मृतदेह खाऊन झाल्यावर दोन्ही वाघ पुन्हा त्याच झाडाखाली आले. पूर्ण आठ तास दोन्ही वाघ त्या झाडाखाली फिरत राहिले. साडे तीन वाजता ते जंगलात गेले.