पायलट पॉझिटिव्ह; रशियाला निघालेले विमान पुन्हा दिल्लीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 04:46 AM2020-05-31T04:46:57+5:302020-05-31T04:47:06+5:30
अर्ध्या रस्त्यातून माघारी । मॉस्कोसाठी एअर इंडियाचे दुसरे विमान रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रशियात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या मॉस्कोकडे रवाना झालेल्या रिकाम्या विमानाच्या दोन वैमानिकांपैकी एक वैमानिक कोरोराग्रस्त असल्याचे लक्षात आल्याने हे विमान अर्ध्या रस्त्यातून माघारी वळवून शनिवारी दुपारी पुन्हा दिल्लीला परत आणण्यात आले.
सूत्रांनी सांगितले की, एअर इंडियाचे एअरबस ए-३२० निओ हे विमान शनिवारी सकाळी फक्त विमान कर्मचाऱ्यांना घेऊन दिल्लीहून मॉस्कोकडे रवाना झाले. त्यानंतर विमानाच्या दोन वैमानिकांपैकी एकाचा कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला असूनही त्याला विमान घेऊन पाठविले गेल्याचे लक्षात आले. तोपर्यंत सुमारे दोन तास प्रवास करून हे विमान उझबेगिस्तानच्या हवाईहद्दीत पोहोचले होते. लगेच वैमानिकांना विमान माघारी वळविण्याचा संदेश पाठविण्यात आला. हे विमान दुपारी १२.३० च्या सुमारास दिल्लीला परत आले.
या विमानातील वैमानिकांसह सर्व कर्मचाऱ्यांना लगेच क्वारंटाईनमध्ये पाठवून विमानाचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
तातडीने दुसरे तशाच प्रकारचे विमान तयार करून ते सायंकाळी पुन्हा मॉस्कोकडे रवाना करण्यात आले. सध्या एअर इंडिया ‘वंदे भारत’ मोहिमेंतर्गत परदेशांत अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी अनेक देशांमध्ये विशेष विमाने पाठवत आहे. या विमानांमधील सर्व कर्मचारी व वैमानिकांची कोरोना चाचणी करून ती ‘निगेटिव्ह’ असेल, तरच त्यांना नेमण्याचे सक्त आदेश भारत सरकारने दिले आहेत. त्यानुसार विशेष विमानांसाठी ड्यूटीवर पाठवायच्या कर्मचाºयांच्या चाचण्या करण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज अशा चाचण्यांचे सुमारे ३०० अहवाल येत असतात. ते पाहून ज्यांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ नाहीत, अशांनाच या विशेष विमानांवर नेमले जाते. चाचणी अहवाल पाहणाºया कर्मचाºयाने नजरचुकीने या वैमानिकाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ऐवजी ‘निगेटिव्ह’ असा वाचला व त्यामुळे या वैमानिकास मॉस्कोला जाणाºया विमानासाठी नेमले गेले. कामाच्या व्यापामुळे ही चूक झाली; पण ती दडपून न टाकता प्रामाणिकपणे कबूल करून लगेच सुधारली गेली, हे लक्षात घ्यायला हवे. कर्मचाºयांना त्यांच्या पगाराच्या सुमारे ७० टक्के रक्कम ‘फ्लाईट अलाऊन्स’ म्हणून मिळते. गेले तीन महिने ही रक्कम मिळालेली नाही.
टोळधाडीचा विमानांनाही धोका;
सावधानतेचा डीजीसीएचा इशारा
नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागांत टोळधाडीचा धुमाकूळ सुरू असल्याने विमानाचे लँडिंग आणि टेकआॅफ करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन नागरी उड्डयन महासंचालनालयाने केले आहे.
डीजीसीएने याबाबत दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की, साधारणत: टोळ जमिनीपासून खालच्या स्तरावर दिसून येतात. यामुळे विमानाचे टेकआॅफ व लँडिंग करताना धोका निर्माण होऊ शकतो. हे टोळ झुंडीने फिरत असल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. उड्डाणाच्या दरम्यान पायलटने याकडे लक्ष द्यावे. यामुळे वायपर आणि वाइंड शिल्डचा उपयोग करण्याची स्थिती आणखी खराब होऊ शकते.
डीजीसीएने एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स यांना सांगितले आहे की, याबाबत माहिती मिळताच पायलटस्ना सावधान करण्यास सांगितले आहे. अर्थात, या टोळधाडी रात्रीच्या वेळेस उडत नाहीत. या टोळधाडी पाकिस्तानातून भारतात आल्या आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान आणि देशाच्या अन्य भागात या धाडी जात आहेत.
100-150 कि.मी.चा प्रवास हे टोळ एका दिवसात करतात. या टोळधाडी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.