वैमानिकाच्या एका चुकीमुळे प्रवाशांची उडाली घाबरगुंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 09:04 AM2018-11-11T09:04:04+5:302018-11-11T09:10:35+5:30
दिल्लीहून कंधारला जाणाऱ्या विमानात वैमानिकाच्या एका चुकीमुळे प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीहून कंधारला जाणाऱ्या विमानात वैमानिकाच्या एका चुकीमुळे प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाल्याची घटना समोर आली आहे. विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना वैमानिकाने चुकून 'हायजॅक बटण' म्हणजेच विमानाचे अपहरण होत असल्याची सूचना देणारे बटण दाबल्याने गोंधळ झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचे अपहरण होत असल्याची सूचना मिळताच प्रवाशांसह दिल्ली विमानतळावर सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दिल्ली विमानतळाहून अफागाणिस्तानमधील कंधारसाठी FG312 हे विमान उड्डाण घेत होते. वैमानिकाने विमान सुरू करताना चुकून विमान हायजॅकचे बटण दाबले. त्यामुळे एनएसजी कमांडो आणि इतर सुरक्षा रक्षकांनी विमानाला सर्व बाजूंनी वेढा घातला.
सुरक्षा रक्षकांनी विमानाची नीट तपासणी केल्यानंतर दी एरियाना अफगाण एअरलाइन्सचे विमान दोन तास उशिराने रवाना झाले. कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया याबाबत त्वरित उपलब्ध झाली नसली तरी विमानाचे अपहरण होत असल्याची सूचना देणारे बटण दाबण्यात आल्याने राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) या दहशतवादविरोधी दलासह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या होत्या. मात्र अखेर वैमानिकाने चुकून हे बटण दाबल्याचे लक्षात आले.