‘एअर इंडिया’च्या पायलटांचे चोचले आता होणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 02:49 AM2019-06-20T02:49:17+5:302019-06-20T06:36:42+5:30
कक्ष कर्मचाऱ्यांना जेवण गरम करणे, सलाड तयार करणे, डबे विसळणे अशी कामे न सांगण्याचा निर्णय
नवी दिल्ली : एअर इंडियाचे पायलट घरून आणलेले जेवण विमानातील कक्ष कर्मचारी सदस्यांकडून (केबिन क्रू मेंबर) गरम करून घेतात, प्रसंगी त्यांच्याकडून विशेष सलाड बनवून घेतात तसेच डबेही विसळायला लावतात, असे आढळून आले आहे. पायलटांचे चोचले आता बंद होणार आहेत. बुधवारी यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. एअर इंडियाचे चेअरमन अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, ‘हा प्रकार थांबायलाच हवा, नव्हे तो थांबेलच.’
खरेतर याबाबत कक्ष कर्मचाऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या परंतु त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. बंगळुरू-कोलकाता मार्गावरील एअर इंडियाच्या विमानात डबा विसळण्याच्या कारणावरून एक कॅप्टन आणि फ्लाईट पर्सर यांच्यात हाणामारी झाली होती. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एअर इंडियाने या दोघांनाही कामावरून बाजूला केले आहे.
खासगी कंपन्यांमध्ये हे प्रकार नाहीत : अनेक वेळा तर जेवणाचे डबे विसळण्यासही कर्मचाऱ्यांना सांगितले जाते. कक्ष कर्मचारी हे प्रवाशांच्या सेवेसाठी आहेत, पायलटांच्या सेवेसाठी नव्हे. विशेष म्हणजे, हा प्रकार केवळ एअर इंडियाच्या विमानातच होतो. खासगी विमान कंपन्यांचे पायलट अशी कामे कक्ष कर्मचाºयांना सांगत नाहीत.