वैमानिकांनो, परफ्युम वापरू नका; निर्देश जारी करण्याचे डीजीसीएचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 08:17 AM2023-10-03T08:17:55+5:302023-10-03T08:18:16+5:30
परफ्युम, काही औषधे, माऊथवॉश यांच्यामध्ये अल्कोहोलची मात्रा असते.
मुंबई : परफ्युम, विशिष्ट माऊथवॉश यामध्ये अल्कोहोलचा वापर असल्यामुळे त्यांचा वापर वैमानिक तसेच केबिन कर्मचाऱ्यांनी टाळावा, याकरता सिव्हिल एव्हिएशनच्या नियमांत बदल करण्यासाठी चाचपणी सुरू करण्यात आली असून त्यादृष्टीने विमान कंपन्या, वैमानिक व विमान उद्योगाशी संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या सूचना व हरकती प्राप्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने विमान प्रवासादरम्यान वैमानिक व केबिन कर्मचाऱ्यांना परफ्युम, माऊथवॉश, विशिष्ट प्रकारची औषधे यांच्या वापरावर बंदी घालण्यासंदर्भातील निर्देश जारी करण्याचे संकेत मिळत आहेत.
परफ्युम, काही औषधे, माऊथवॉश यांच्यामध्ये अल्कोहोलची मात्रा असते. त्यामुळे मद्यप्राशन केले नसले तरी या घटकांच्या वापरांमुळे वैमानिकांच्या ब्रेथ ॲनालायझर चाचणी दरम्यान अल्कोहोलचे प्रमाण सकारात्मक येऊ शकते. तसे आल्यास त्यांना उड्डाणास प्रतिबंध केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर बचावात्मक योजना म्हणून या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औषधांबद्दलही डॉक्टरांशी चर्चा करा...
ज्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट प्रकारचे आजार आहेत किंवा औषधे घ्यावी लागतात त्यांनी आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून आपल्या कामाची कल्पना त्यांना द्यावी, अशाही अनौपचारिक सूचना काही विमान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. येत्या दोन महिन्यांत या मुद्द्यावर डीजीसीएकडून निर्देश जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.