'मॅकडोनल्ड'च्या 'फ्रेंच फ्राइज'मध्ये आढळली मेलेली पाल
By admin | Published: March 2, 2017 06:14 PM2017-03-02T18:14:24+5:302017-03-02T18:46:53+5:30
फास्ट फूड पदार्थांसाठी तरूणांचं आवडीचं ठिकाण मॅकडोनल्डच्या फ्रेंच फ्राइजमध्ये मेलेली पाल आढळल्याची गंभीर घटना समोर
Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 2 - फास्ट फूड पदार्थांसाठी तरूणांचं आवडीचं ठिकाण मॅकडोनल्डच्या फ्रेंच फ्राइजमध्ये मेलेली पाल आढळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. कोलकाताच्या ईएम बायपास येथील मॅकडोनल्डच्या आउटलेटमध्ये ही धक्कादायक घटना घडली. घटनेवर आउटलेटच्या मॅनेजरने समाधानकारक उत्तर न देता हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी कालकातायेथील रहिवासी प्रियंका मित्रा आपल्या मुलीसोबत ईएम बायपास येथील मॅकडोनल्डमध्ये गेल्या आणि मुलीसाठी फ्रेंच फ्राइजची ऑर्डर दिली. मुलगी राजनंदिनी फ्रेंच फ्राइज खाण्यात व्यस्त असताना फ्रेंच फ्राइजच्या पाकिटात पाल असल्याचं प्रियंका यांना दिसलं. आउटलेटच्या मॅनेजरला त्यांनी याबबात तक्रार केली.
मात्र, मॅनेजरने कोणतही समाधानकारक उत्तर न देता केवळ सॉरी बोलून झालेला प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला असा आरोप प्रियंका यांनी केला आहे. त्या नंतर प्रियंका यांनी फ्रेंच फ्राइजच्या पाकिटाचा फोटो काढला आणि पोलीस स्थानकात जाऊन एफआयआर दाखल केली आहे.
प्रियंका यांचे पती संजय मित्रा यांनी याबाबत दिल्लीच्या मॅकडोनल्ड ऑफीसमध्येही संपर्क साधला मात्र, त्यांनीही बेजबाबदारपणे उत्तरं दिली. प्रियंका या गर्भवती असून झालेल्या घटनेनंतर त्या अस्वस्थ आहेत . जर त्या पाकिटावर लक्ष गेलं नसतं तर काय झालं असतं या विचाराने त्या विचलीत होतात, असं त्यांच्या पतीने सांगितलं.
यासोबत मॅक-डीमध्ये काहीही खाण्याआधी सतर्कता बाळगा असं आवाहन त्यांनी सर्व मॅक-डी लव्हर्सना केलं आहे