हरियाणामध्ये भाजपा आमदारावर रोखली पिस्तूल, गर्दीमधील व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 05:46 PM2024-07-27T17:46:42+5:302024-07-27T17:47:23+5:30
Haryana Crime News: राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या आमदारावर गुन्हेगारांनी पिस्तूल रोखल्याची धक्कादायक घटना हरियाणामध्ये घडली आहे. मात्र तिथे उपस्थित असलेल्यांपैकी एकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे भाजपा आमदाराचे प्राण वाचले.
राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाच्याआमदारावर गुन्हेगारांनी पिस्तूल रोखल्याची धक्कादायक घटना हरियाणामध्ये घडली आहे. मात्र तिथे उपस्थित असलेल्यांपैकी एकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे भाजपाआमदाराचे प्राण वाचले. या गोंधळात हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. सध्या हांसी येथील पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
मागच्या काही काळापासून हरियाणामध्ये गुन्हेगार मोकाट झाले आहे. हिसारमधील हांसी येथे पंधरवड्यापूर्वी जेजेपीच्या एका नेत्याची हत्या झाली होती. आता भाजपा आमदार विनोद भयाना यांच्यावर पिस्तूल रोखल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हांसी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार विनोद भयाना हे ट्रक युनियन आणि ऑटो मिस्त्री संचालकांमध्ये झालेल्या एका वादाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळावर पोहोचले होते. ट्रक युनियनकडून स्थानिक आमदारांशी संपर्क साधल्याने ते तिथे पोहोचले होते.
विनोद भयाना हे तिथे पोहोचले असताना ट्रक युनियनच्या जमिनीवरून झालेल्या वादातून काही बदमाशांनी आमदार विनोद भयाना यांच्यावर पिस्तूल रोखली. यादरम्यान, तिथे उपस्थित असलेल्यांपैकी एकाने या बदमाशांच्या दिशेने दगड फेकला त्यामुळे त्यांच्या हातातून पिस्तूल खाली पडली. तसेच ते घटनास्थळावरून फरार झाले.
ट्रक युनियनच्या ६ हजार यार्ड जागेवरून हा वाद सुरू आहे. सुमारे ५ दिवसांपूर्वी प्रशासनाने ट्रक युनियनच्या ताब्यातून ही जागा मोकळी केली होती. त्यावरून आज वाद झाला. तसेत त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदारांना बोलावण्यात आलं होतं. सध्या घटनास्थळावरून पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. तसेच ट्रक युनियनच्या माजी प्रमुखांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.