भयंकर! गच्चीवर खेळणाऱ्या मुलीवर पिटबुलचा जीवघेणा हल्ला; तोडले लचके, चेहऱ्यावर जखमा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 02:01 PM2022-12-17T14:01:39+5:302022-12-17T14:02:14+5:30
एक नऊ वर्षांची मुलगी गच्चीवर खेळत असताना शेजाऱ्यांनी पाळलेल्या पिटबुल कुत्र्याने उडी मारून तिच्यावर अचानक हल्ला केला.
हरियाणातील करनाल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पिटबुल कुत्र्याने गच्चीवर खेळणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक नऊ वर्षांची मुलगी गच्चीवर खेळत असताना शेजाऱ्यांनी पाळलेल्या पिटबुल कुत्र्याने उडी मारून तिच्यावर अचानक हल्ला केला.
पिटबुलच्या मालकिणीने खूप प्रयत्नांनंतर मुलीला त्याच्या ताब्यातून सोडवलं; पण तोपर्यंत त्याने मुलीच्या चेहऱ्याची एक बाजू चावली होती. त्यानंतर उपचारासाठी मुलीला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कर्नालच्या शिव कॉलनीतल्या गल्ली क्रमांक 2 मध्ये राहणाऱ्या मुलीच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की, मुलीचे वडील गावी गेले आहेत. शेजारी पाळलेल्या पिटबुलने मुलीला चावा घेतल्याची माहिती मिळताच तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. या पिटबुलमुळे आजूबाजूला राहणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पिटबुल मोकळा फिरत असल्याची माहिती त्याच्या मालकाला अनेकदा देण्यात आली. मात्र मालकाने त्यावर काहीही उपाययोजना केली नाही. मालकाच्या निष्काळजीपणाचे दुष्परिणाम एका लहान मुलीला भोगावे लागत आहेत. मुलीवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितलं, की मुलीला जखमी अवस्थेत येथे दाखल करण्यात आलं आहे. कुत्र्याने मुलीच्या चेहऱ्यावर चावा घेतला आहे. मुलीच्या तोंडावर आणि कानावर मोठ्या जखमा आहेत. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. जखम मोठी असल्याने तिचं ऑपरेशन केलं जाणार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. कुत्र्याच्या मालकावर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, कर्नालमध्ये यापूर्वीही अनेकदा पिटबुल जातीच्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. धोकादायक पिटबुल कुत्रे रहिवासी परिसरात ठेवणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"