लखनौमध्ये पिटबुलने पुन्हा केला हल्ला, पार्कमध्ये आईसोबत फिरणारा तरुण जखमी, एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 11:13 AM2022-09-12T11:13:07+5:302022-09-12T11:15:42+5:30
Uttar Pradesh News: राजधानी लखनौमध्ये पिटबुल जातीच्या कुत्र्याने हल्ला केल्याची अजून एक घटना घडली आहे. ही घटना गोमतीनगर विरामखंड दोन येथील पार्कमध्ये घडली आहे.
लखनौ - राजधानी लखनौमध्ये पिटबुल जातीच्या कुत्र्याने हल्ला केल्याची अजून एक घटना घडली आहे. ही घटना गोमतीनगर विरामखंड दोन येथील पार्कमध्ये घडली आहे. तिथे एक तरुण आपल्या आईसोबत फिरत होता. त्यादरम्यान, कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाच्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. या तरुणाला वाचवताना त्याची आईही जखमी झाली आहे. या प्रकरणी तरुणाने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.
याबाबत जखमी प्रांजल मिश्रा यांनी सांगितले की, मी माझ्या आईसोबत शनिवारी रात्री सुमारे साडे दहा वाजता जेवून पार्कमध्ये फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी एका ८-९ वर्षांच्या मुलासह एक १७ वर्षांचा मुलगा कुत्र्याला फिरण्यासाठी घेऊन आला होता. मी त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने माझ्या हाताचा चावा घेतला. आईने हे पाहिले तेव्हा ती मला वाचवण्यासाठी धावत आली. मात्र ती मध्येच घसरून पडली. एवढ्यामध्ये कुत्र्याने माःझ्या हाताचा चावा घेतला. तेवढ्यात तिथे कुत्र्याला फिरवत असलेले दोन्ही तरुण तिथून पसार झाले.
या प्रकरणी गोमतीनगरचे इन्स्पेक्टर दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, पीडित प्रांजल मिश्रा यांच्याकडून अज्ञातांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यावर भादंवि कलम २८९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आता पिटबुलच्या मालकाचा शोध सुरू आहे. लवकरच या प्रकरणाची पुढील तपास सुरू आहे.