पिटबुलचा 10 वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला; संपूर्ण चेहरा फाडला, डॉक्टरांनी लावले 150 टाके
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 07:47 PM2022-09-08T19:47:11+5:302022-09-08T19:47:43+5:30
गेल्या काही महिन्यांपासून देशभरात पिटबुलच्या हल्ल्यांच्या अनेक घटना घडत आहेत.
गाझियाबाद: देशभरात पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. विशेषत: दिल्ली एनसीआरमध्ये अशाप्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. आता ताजी घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. पिटबुल जातीच्या कुत्र्याने एका 10 वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला केला, यात जखमी झालेल्या मुलाच्या चेहऱ्यावर 150 टाके लावावे लागले.
काही दिवसांपूर्वीच गाझियाबादच्या एका सोसायटीत लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याने मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर नोएडाचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये कुत्र्याने लिफ्टमधील एका व्यक्तीवर मालकासमोर हल्ला केला. आता पुन्हा एकदा गाझियाबादमधून कुत्र्याच्या हल्ल्याची बातमी समोर आली आहे. उद्यानात खेळणाऱ्या एका 10 वर्षीय मुलावर पिटबुलने हल्ला चढवला. ही घटना चार दिवसांपूर्वी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
तोंडावर 150 टाके
उद्यानात खेळणाऱ्या मुलावर पिटबुलने अचानक हल्ला केला, कुत्र्याने मुलाचे तोंड आपल्या जबड्यात पकडले. यावेळी कुत्र्याने त्या निष्पापाचे गाल फाडले. कसेबसे कुत्र्याच्या तावडीतून बालकाची सुटका करून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर 150 टाके टाकले आहेत.
पोलिसांत तक्रार दाखल
गाझियाबादच्या बापुधाम भागातील संजय नगरमध्ये ही घटना घडली असून मुलाच्या कुटुंबीयांनी याबाबत तक्रारही दाखल केली आहे. या कुत्र्याच्या मालकाचे नाव ललित त्यागी असून तो संजय नगर परिसरात राहतो. दरम्यान, काही दिवसांपूर्वी लखनौमध्ये एका पिटबुलने आपल्या वृद्ध मालकिनीवर हल्ला करुन जीव घेतला होता. हल्ल्यानंतर प्रशासनाने कुत्र्याला आपल्या ताब्यात घेतले. त्या घटनेची देशभर चर्चा झाली होती.