पियूष गोयल, स्मृती इराणींना दे धक्का; आणखी एक महत्त्वाचं खातं गुजराती व्यक्तीकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 11:32 PM2021-07-07T23:32:54+5:302021-07-07T23:33:32+5:30
मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल; गोयल, इराणी यांच्याकडून महत्त्वाची खाती काढली
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न झाल्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अनेक महत्त्वाची खाती असलेल्या मंत्र्यांना आज नारळ देण्यात आल्यानं खातेवाटपाकडे लक्ष लागलं होतं. मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
मोठे बदल! रेल्वेमंत्रिपदावरून गोयल यांना डच्चू; अमित शहांवर मोठी जबाबदारी
पियूष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आलं आहे. रेल्वेची जबाबादारी अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गोयल यांच्याकडे वस्त्रोद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी असेल. अरुण जेटली यांच्या निधनानंतर अर्थमंत्री म्हणून काम केलेल्या गोयल यांच्याकडे रेल्वेसारखं महत्त्वाचं खातं देण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना डच्चू मिळाला आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का देण्याची तयारी?; मोदींनी शहांवर सोपवली नवी जबाबदारी
स्मृती इराणी यांच्याकडून वस्त्रोद्योग मंत्रालय काढून घेण्यात आलं आहे. आता त्यांच्याकडे केवळ महिला आणि बालकल्याण मंत्रालयाचा कारभार ठेवण्यात आला आहे. स्मृती यांनी याआधी शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यावेळी त्यांची डिग्री वादात सापडली होती. काही काळासाठी त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभारदेखील होता. २०१९ च्या निवडणुकीनंतर त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलं. मात्र आता या महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे.
गुजराती व्यक्तीकडे आणखी एक महत्त्वाचं खातं
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मूळचे गुजरातचे आहेत. त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून अनेक वर्षे काम केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रीपद अमित शहांकडे आहे. यानंतर आता आरोग्य मंत्रिपददेखील गुजराती व्यक्तीकडे सोपवण्यात आलं आहे. मनसुख मांडविया यांच्याकडे आरोग्य मंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. मांडविया मोदींचे विश्वासू मानले जातात. शहांकडे गृह मंत्रालयासोबतच सहकार मंत्रालयाची जबाबदारीदेखील दिली गेली आहे. या मंत्रालयाची निर्मिती कालच करण्यात आली आहे.