Piyush Goyal on RRR: देशाची अर्थव्यवस्था आणि RRR चित्रपटाचे कनेक्शन? केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 06:23 PM2022-04-03T18:23:31+5:302022-04-03T18:26:25+5:30
Piyush Goyal on RRR: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी RRR चित्रपट आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे उदाहरण दिले.
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री पियुष गोयल(Piyush Goyal ) यांनी आज देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. देशात 418 अब्ज डॉलर्स म्हणजेच 32 लाख कोटी रुपयांची निर्यात झाल्याची त्यांनी माहिती दिली. ही ठरलेल्या उद्दिष्टापेक्षा 5% जास्त आहे. मोदी सरकारच्या योजनेंतर्गत सातत्याने निर्यात वाढवण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
'देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल'
गेल्या आर्थिक वर्षात विविध क्षेत्रातील निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. गोयल म्हणाले की, पूर्वीची निर्यात सामान्यतः केवळ विकसनशील देशांनाच होती, जी आता विकसित देशांनाही मोठ्या प्रमाणात होत आहे. उदाहरणार्थ, रत्ने आणि दागिन्यांची सर्वाधिक निर्यात चीनला झाली आहे. देश आता आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करत असल्याचेही ते म्हणाले.
RRR चित्रपटाचे उदाहरण
पीयूष गोयल पुढे म्हणाले की, सध्या दर महिन्याला $30 बिलियन पेक्षा जास्तीची निर्यात होत आहे. कोरोनाच्या दोन लाटानंतरही देशाने हे यश मिळवले आहे. आरआरआर(RRR) चित्रपटाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, भारतात सध्या RRR चित्रपट खूप गाजत आहे. हा भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटाप्रमाणे भारतदेखील प्रत्येक क्षेत्रात सातत्याने यश मिळवत आहे, असे ते म्हणाले.
गव्हाची विक्रमी निर्यात
गोयल यांनी यावेळी गव्हाच्या निर्यातीबाबत माहिती दिली. 2019-20 मध्ये 2 लाख टन म्हणजे 500 कोटी गव्हाची निर्यात झाली होती. तर, 2020-21 मध्ये 21.55 लाख टन म्हणजेच सुमारे 4000 कोटींची निर्यात झाली. यानंतर 2021-22 मध्ये भारताने 70 लाख टनांहून अधिक म्हणजे 15,000 कोटींहून अधिकची निर्यात केलीली.