दिल्लीच्या धर्तीवर बिहार काबीज करण्याची योजना; 2 कोटी बिहारींसाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:22 IST2025-03-18T17:22:20+5:302025-03-18T17:22:49+5:30

भाजपने स्वबळावर बिहारची सत्ता काबीज करण्याच्या दिशेने योजना आखली आहे.

Plan to capture Bihar on the lines of Delhi; BJP's mega plan prepared for 2 crore Biharis | दिल्लीच्या धर्तीवर बिहार काबीज करण्याची योजना; 2 कोटी बिहारींसाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार...

दिल्लीच्या धर्तीवर बिहार काबीज करण्याची योजना; 2 कोटी बिहारींसाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार...


Bihar Election 2025 : भाजपने सलग तीन वेळा देशाची सत्ता काबीज केली, पण बिहारमध्ये त्यांना स्वबळावर सरकार बनवता आलेले नाही. जाती-धर्माच्या राजकारणाने वेढलेल्या बिहारमध्ये भाजपला सातत्याने नितीशकुमारांचा टेकू घ्यावा लागत आहे. पण, आता भाजपने राज्यात स्वबळावर सत्ता काबीज करण्याच्या दिशेने मार्गक्रमन केल्याचे पाहायला मिळत आहे.  सात महिन्यांनी होऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आतापासूनच तयारीला लागला आहे. नितीश मंत्रिमंडळाच्या विस्तारातून भाजपने आधीच आपली पॉवर दाखवली आहे. आता भाजपने बिहारबाहेर राहणाऱ्या बिहारी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

बिहारच्या सत्तेने अनेकदा भाजपाला हुलकावणी दिली आहे. पण, आता बिहार काबीज करण्यासाठी भाजपने नव्या रणनीतीवर काम सुरू केले आहे. 'एक भारत श्रेष्ठ भारत, स्नेह मिलन' कार्यक्रमांतर्गत भाजपने देशभरात राहणाऱ्या बिहारी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दिल्ली निवडणुकीच्या 'चोखा-बाटी' मोहिमेपासून प्रेरणा घेत भाजप एनआरआय बिहारींचा पाठिंबा मिळवण्यासाठी विविध शहरांमध्ये सभा घेणार आहे. 22 मार्च रोजी बिहार दिनानिमित्त भाजप या योजनेचा शुभारंभ होणार आहे. 22 मार्च ते 30 मार्च या कालावधीत भाजप नेते देशातील विविध राज्यात राहणाऱ्या बिहारमधील लोकांच्या बैठका घेणार आहेत. 

दिल्लीच्या धर्तीवर बिहार जिंकण्याची योजना 
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पूर्वांचली मतांचा विश्वास जिंकण्यासाठी भाजपने 'चोखा-बाटी' हा कार्यक्रम आयोजित केला होता. या निमित्ताने दिल्लीत राहणाऱ्या बिहारच्या जनतेशी संवाद प्रस्थापित करण्यात भाजप नेत्यांना यश आले आणि आता त्याच धर्तीवर देशभरात राहणाऱ्या बिहारी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. परदेशात राहणाऱ्या बिहारमधील लोकांसोबत कार्यक्रम आयोजित करण्यासाठीदेखील भाजप एक टीम तयार करणार आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी एक टीम असेल, जी प्रमुख शहरे आणि भागात संवाद स्थापित करण्याचा प्रयत्न करेल.

या सर्व कार्यक्रमात बिहार भाजपचे नेतेही सहभागी होणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमांची योग्य प्रसिद्धी आणि कव्हरेज केले जाईल. या कार्यक्रमात भाजपचे बिहार सरकारचे मंत्री, आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांसह अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत. दिल्लीत पाच, झारखंडमध्ये सात, महाराष्ट्रात सात, यूपीमध्ये सहा, हरियाणामध्ये सात, गुजरात, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये प्रत्येकी सहा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय आसाम, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्येही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यांव्यतिरिक्त अन्य काही राज्यांतील भाजप नेतेही बिहारमधील जनतेच्या बैठका घेऊन त्यांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करतील.

Web Title: Plan to capture Bihar on the lines of Delhi; BJP's mega plan prepared for 2 crore Biharis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.