योजना आयोग यापुढे ‘नियंत्रण आयोग’ नसणार
By admin | Published: July 12, 2014 01:47 AM2014-07-12T01:47:07+5:302014-07-12T01:47:07+5:30
योजना आयोग प्रत्यक्षात नियंत्रण आयोग बनल्याची टीका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या आयोगाच्या नव्या भूमिकेबाबत घोषणा करतील, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
Next
नवी दिल्ली : योजना आयोग प्रत्यक्षात नियंत्रण आयोग बनल्याची टीका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या आयोगाच्या नव्या भूमिकेबाबत घोषणा करतील, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
गेल्या महिन्यात स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाने(आयईओ) योजना आयोग प्रत्यक्षात नियंत्रण आयोग बनले असून त्याऐवजी ‘सुधारणा आणि तोडगा काढणारे ’ मंडळ अशी भूमिका असायला हवी, असे स्पष्ट केले होते. नव्या सरकारची स्थापना होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला असताना आतार्पयत योजना आयोगाच्या उपाध्यक्षांची घोषणा झालेली नाही. गेल्या दहा वर्षापासून या पदावर मोंटेकसिंग अहलुवालिया होते. सरकारने योजना आयोगाच्या भूमिकेबाबत काय विचार केला आहे, असे विचारले असता जेटली एका मुलाखतीत म्हणाले की, त्याबाबत पंतप्रधानच एखादी घोषणा करतील. थोडा काळ प्रतीक्षा करा, आपल्याला लवकरच काही ऐकायला मिळेल.
सरकारच्या कार्यक्रमांची परिणामकारकता, संस्थांच्या धोरणांचा आढावा घेऊन शिफारशी करण्यासाठी अलीकडेच मोदींनी आयईओची स्थापना केली आहे. योजना आयोगाची भूमिका केवळ राज्यांना संसाधनांचे वाटप करण्यापुरती सीमित झाली आहे. ही भूमिका वित्त आयोगाकडे द्यायला हवी. मंत्रलयांना संसाधने पुरविण्याचे काम अर्थमंत्रलयाने करावे. सध्याच्या योजना आयोगाची जागा तज्ज्ञांकडे दिली जावी, असे आयईओने सुचविले आहे. सध्याच्या स्वरूपातील आयोग व त्याचे काम देशाच्या विकासासाठी लाभकारक नाही, असे आयईओचे महासंचालक अजय छिब्बर यांनी म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)